२००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा क्रिकेटपटू युवराज सिंह हा पंजाबमधीलगुरदासपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या चर्चेला वेग आल्यावर युवराज सिंग यांने ही शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा खऱ्या नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. युवराज सिंगने सोशल मीडिया हँडल एक्सवर एक पोस्ट लिहून आपण गुरदासपूर येथून निवडणूक लढवण्यार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या पोस्टमध्ये युवराज सिंग म्हणाला की, मी गुरदासपूर येथून निवडणूक लढवणार नाही. गरजू लोकांची मदत करणं हे माझं लक्ष्य आहे. ते मी माझ्या 'YOUWECAN' या फाउंडेशनच्या माध्यमातून कायम ठेवेन. YouWeCan ही युवराज सिंगची एनजीओ आहे. तिच्या माध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांची मदत केली जाते. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर युवराज सिंगने अमेरिकेत जाऊन कर्करोगाववर उपचार घेतले होते. त्यानंतर त्याने YouWeCan फाउंडेशनची स्थापना केली होती.
युवराज सिंहने २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या क्रिकेट विश्वचषकामध्ये भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. २००० साली केनियाविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवराज सिंगने ३० जून २०१७ रोजी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. युवराज सिंग हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चमकला होता. त्याने ३०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा जमवल्या होत्या. त्यामध्ये १४ शकते आणि ५२ अर्धशतकांचा समावेश होता. १५० ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याशिवाय युवराजने अष्टपैलूत्वाची चमक दाखवताना १११ बळीही टिपले होते.