Join us  

... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला

भारताचा माजी अष्टपैलू फलंदाज युवराज सिंगनं मंगळवारी इंस्टाग्राम लाईव्हवर मनमोकळ्या गप्पा मारल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:42 AM

Open in App

भारताचा माजी अष्टपैलू फलंदाज युवराज सिंगनं मंगळवारी इंस्टाग्राम लाईव्हवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यानं टीम इंडियाच्या फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवाय त्यानं अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एक सल्लाही दिला. 

युवीनं राठोड यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय बांगर यांच्या जागी राठोड यांची फलंदाजी  प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली. युवी म्हणाला,''राठोड माझा मित्र आहे. ट्वेंटी-20 जनरेशनच्या खेळाडूंना तो मदत करू शकतो, असं तुम्हाला वाटतं का? त्या लेव्हलचं क्रिकेट तो खेळला आहे का?'' 2007 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा सदस्य असलेल्या युवीनं इंस्टाग्राम चॅटवर हे प्रश्न उपस्थित केले. राठोड यांनी 1996-97 या कालावधीत सहा कसोटी आणि सात वन डे सामने खेळले.

यावेळी युवीनं शास्त्रींना एक सल्ला दिला. खेळाडूंच्या व्यक्तिमत्वानुसार त्यांच्याशी वागलं पाहीजे. तो म्हणाला,''जर मी प्रशिक्षक असतो तर मी जसप्रीत बुमराहला रात्री 9 वाजता शुभ रात्री म्हटलं असतं आणि 10 वाजता हार्दिक पांड्याला ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो. विविध व्यक्तिमत्व असलेल्या खेळाडूंशी असा संवाद साधायला हवा.''

युवीनं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवीनं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींची फिरकी घेतली. ''सध्याचे खेळाडू जास्त बोलत नाही आणि सल्लाही घेत नाहीत. रवी शास्त्री खेळाडूंना मार्गदर्शन करतात की नाही, हे मला माहित नाही, परंतु त्यांच्याकडे अन्य जबाबदारी असेल. मैदानावर जा आणि तुझा खेळ कर, असं तुम्ही प्रत्येकाला सांगू शकत नाही. असा दृष्टीकोन सेहवागसारख्या खेळाडूसाठी योग्य आहे, परंतु पुजाराच्या तो कामी येणार नाही. प्रशिक्षकांच्या स्टाफनं याचा विचार करायला हवा.''

''किंग्स इलेव्हन पंजाब संघापासून मला दूर पळायचे होते. संघाचे व्यवस्थापन मला पसंत करत नव्हते. मी त्यांना काही करायला सांगितले, तर ते कारचेच नाही. मला पंजाब आवडते, परंतु फ्रँचायझीचा कारभार मला आवडला नाही.''

 

टॅग्स :युवराज सिंगरवी शास्त्रीहार्दिक पांड्याजसप्रित बुमराह