भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग याला कुठल्या वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही. सहा चेंडूत सहा षटकार ठोकत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. मात्र युवराज सिंगचा धाकटा भाऊ मात्र कधीच फारसा चर्चेत आला नाही. युवराजचा धाकटा भाऊ आणि योगराज सिंग यांचा मुलगा व्हिक्टर योगराज सिंगबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो आता फिल्मी जगतामध्ये आपलं पाऊल ठेवणार आहे.
व्हिक्टर योगराज सिंग सांगतो की, अभिनय आणि क्रिकेट माझ्या रक्तातच आहे. करिअर म्हणून अभिनय आणि खेळ यांची निवड करण्याची वेळ आली तेव्हा मी द्विधा मनस्थितीत होतो. त्याचं कारण म्हणजे मला दोन्ही क्षेत्रांची आवड होती. लहानपणी वडिलांसोबत सेटवर जाणं व्हायचं. त्यानंतर अमेरिकेमध्येही माझा कल हा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला. त्यामुळे आता भविष्यात अभिनय आणि दिग्दर्शन या क्षेत्रातच पुढे जायचं असं मी ठरवलं आणि याच क्षेत्राला करिअर म्हणून निवडलं.
व्हिक्टर योगराज सिंगने न्यूयॉर्कमध्ये दिग्दर्शन आणि लेखनाचं प्रशिक्षण घेतलं आहे. तो लवकरच पंजाबी चित्रपट सृष्टीमध्ये दिग्दर्शक म्हणून नशीब आजमावणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे वडील योगराज सिंग आणि आई नीना बुंधेल यांना दिग्दर्शित करणार आहे. मी वडिलांसोबच सेटवर जायचो तेव्हा मला खूप काही शिकायला मिळायचं. तेव्हापासूनच माझा चित्रपटांकडे कल सुरू झाला होता.
व्हिक्टर सांगतो की, मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. युवराज सिंगने मला खूप पाठिंबा दिला आहे. मात्र एका दुखापतीमुळे मला क्रिकेट सोडावं लागलं. तेव्हा झालं असं की झेल टिपताना चेंडू माझ्या हातावर जोरात आदळला. त्यानंतर बराच काळ सराव करू न शकल्याने मला क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं.
दरम्यान, व्हिक्टरने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची आठवणही काढली. तो म्हणाला की, मी सिद्धू मुसेवाला सोबत एका चित्रपटामध्ये काम केलं होतं. हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. मी मुसेवालाच्या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका केली होता. मी त्याला फार भेटू शकलो नाही, मात्र तो माझ्या कायम आठवणीत राहील.