रोहित शर्माच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. ३७ वर्षीय रोहितच्या नेतृत्वात भारत ट्वेंटी-२० विश्वचषक खेळणार आहे. आगामी विश्वचषक रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा असू शकतो. पण, भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या वडिलांनी एक मोठे विधान करून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत भारतासाठी क्रिकेट खेळू शकतो असा दावा योगराज सिंग यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) सल्ला देताना सांगितले की, जोपर्यंत खेळाडू तंदुरूस्त आहेत तोपर्यंत त्यांना संधी द्यायला हवी. खेळाडूंना याबाबतीत स्वातंत्र्य असणे गरजेचे असून, बीसीसीआयने वयाची मर्यादा विचारात घ्यायला नको.
योगराज सिंग म्हणाले की, कोण किती वर्ष खेळले आहे याची नेहमी चर्चा होत असते. खेळाडूंच्या वयावरून त्यांना हल्ली लेखले जात आहे. पण, हे मला अद्याप कधी समजलेच नाही. जर एखादा खेळाडू ४०, ४२ किंवा ४५ व्या वर्षी तंदुरूस्त असेल आणि चांगली कामगिरी करत असेल तर यात गैर काय? आपल्या देशात लोकांची मानसिकता अशी झाली आहे की, तुम्ही ४० वर्षांचे झाला की वयस्कर होता. युवराज सिंगचे वडील 'स्पोर्ट्स १८' शी बोलत होते.
"मोहिंदर अमरनाथ यांनी ३८ व्या वर्षी क्रिकेट खेळून भारतासाठी विश्वचषक जिंकला. ते अंतिम सामन्यात सामनावीर ठरले होते. त्यामुळे मला वाटते की, भारतीय क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा संपुष्टात आणायला हवी. रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग हे असे दोन महान खेळाडू आहेत, ज्यांनी कधीच फिटनेस आणि ट्रेनिंगबद्दल विचार केला नाही. त्यांना हवे असल्यास ते वयाच्या ५० व्या वर्षांपर्यंत देखील खेळू शकतात", असेही योगराज सिंग यांनी सांगितले. दरम्यान, रोहितच्या नेतृत्वात भारत ट्वेंटी-२० विश्वचषक खेळणार असून, यासाठी बीसीसीआयने आपल्या संघाची घोषणा केली आहे.
भारताचा वर्ल्ड कप संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.