मुंबई - भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग तंदुरूस्त राहण्यासाठी जोरदार मेहनत घेत आहे. भारताच्या राष्ट्रीय संघात समावेशाच्या आशा अंधूक असल्या तरी युवराज स्वतःला पूर्णपणे तंदुरूस्त ठेवण्यासाठी बोटींग, सायकलिंगसह जिममध्ये घाम गाळत आहे. 2018-19च्या स्थानिक स्पर्धेत धावांचे इमले रचण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
यो-यो चाचणीत अपयश आले असले तरी त्याची तंदुरूस्तीसाठी चाललेली धडपड पाहून तो भविष्यात ती नक्की पास करेल, अशी चाहत्यांना आशा आहे. कँसरशी लढा देत युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले. अनेक चढउतारानंतरही त्याने स्थानिक स्पर्धांमध्येही खो-याने धावा केल्या आहेत.
युवराजने 40 कसोटी, 304 वन-डे आणि 58 टी-20 सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतीय संघ अजूनही मधल्या फळीत समर्थ पर्यायाच्या शोधात आहे. या स्थानासाठी अनेक जण शर्यतीत असले तरी युवराज स्वतःला आघाडीवर राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. युवराजने 100 टक्के तंदुरूस्त राहण्याचा निर्धार केला असून त्याने त्यासाठी सराव करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.