भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग कायम प्रसिद्धीच्या झोतात असतो. भारतीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला युवराज सिंग आता एका चोरीच्या घटनेमुळे चर्चेत आला. त्याच्या आईच्या घरी चोरी झाली. युवराज सिंगच्या आईने आता याप्रकरणी हरयाणा पोलिसांकडे तक्रार केली आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, युवराज सिंगची आई शबनन सिंग यांचे घर हरयाणातील पंचकुला येथे असून याच घरात चोरी झाली आहे.
खरं तर चोरीची ही घटना सहा महिन्यांची आहे, मात्र आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज सिंगची आई शबनम सिंग यांनी स्थानिक एमडीसी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितले की, मागील वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये घरी चोरी झाली होती. आम्ही घरात दोन नोकर ठेवले असून त्यांनीच चोरी केली असावी असा संशय आहे. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि ७५ हजार रुपये चोरीला गेल्याचे शबनम यांनी पोलिसांना सांगितले.
१ लाख ७५ हजार रूपये लंपास दरम्यान, ललिता देवी आणि शैलेंद्र दास अशी या संशयितांची ओळख असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार एकूण १ लाख ७५ हजार रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाली आहे.
सहा महिन्यापूर्वीची घटनायुवराजची आई शबनम यांनी तक्रारीत म्हटले की, त्यांचे घर गुडगावमध्ये असून त्या काही काळ तेथे राहायला गेल्या होत्या. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी त्या घरी परतल्या तेव्हा घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीतून दागिने आणि पैसे गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी सर्व नोकरांची चौकशी केल्याचे सांगितले. मात्र नंतर दोन्ही नोकर नोकरी सोडून पळून गेले. अशा स्थितीत यांनीच चोरी केली असावी असा संशय आहे.