नवी दिल्ली : भारतीय संघ आपल्या नवीन मिशनवर म्हणजेच न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. भारतीय संघ तिथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. हार्दिक पांड्या टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व करेल तर शिखर धवनला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाच्या दोन खेळाडूंवर विशेष लक्ष असणार आहे, ज्यांना टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभव विसरून संघ आता पुढे सरसावला आहे. या दौऱ्याची सुरूवात 18 नोव्हेंबरपासून होणार आहे. राहुल द्रविड यांच्या जागी प्रशिक्षकाची भूमिका साकारणाऱ्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या कामगिरीवर देखील सर्वांच्या नजरा असतील.
चहलची फिरकी पाहायला मिळणार? टी-20 विश्वचषकादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फिरकीपटू युजवेंद्र चहलला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. विश्वचषकातील सहा सामन्यांमध्ये आर अश्विनला फिरकीपटू म्हणून संधी मिळाली, तर अक्षर पटेलला दुसरा फिरकीपटू पर्याय म्हणून स्थान देण्यात आले. न्यूझीलंडमध्ये वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे फिरकीपटूचे पर्याय आहेत. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधार कोणाला संधी देतात हे पाहण्याजोगे असणार आहे.
हर्षल पटेलला मिळणार संधी? टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात खेळलेल्या हर्षल पटेलला देखील विश्वचषकातील एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांसोबतच कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी विश्वास दाखवला. खरं तर आता शमीला न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती दिल्यानंतर हर्षल पटेलला संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी टी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"