तिरूअनंतपुरम : न्यूझीलंडच्या संघात अनेक अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यांच्याच जोरावर या संघाने भारताचा राजकोट टी-20 त 40 धावांनी पराभव करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. कॉलिन मनरोच्या शानदार शतकाशिवाय फिरकी गोलंदाज ईश सोढी याने आपल्या गोलंदाजीने भारतीय खेळाडूंना चांगलंच अडचणीत टाकलं. पण बुद्धीबळाच्या पटावर युजवेंद्र चहलला आव्हान देणं ईश सोढीला चांगलंच महागात पडलं आणि त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
विमान प्रवासात ईश सोढीने भारताचा युवा फिरकीपटू आणि अंडर-12 चेस चॅम्पियन राहिलेल्या युजवेंद्र चहलला आव्हान दिलं. पहिल्या मॅचमध्ये चहलने सोढीला आरामात चेकमेट केलं. त्यावर सोढीने दुस-यांदा चहलला चॅलेंज केलं , या सामन्यातही पुन्हा एकदा चहल सोढीवर वरचढ ठरला व त्याने ही मॅचही आरामात खिशात टाकली. यानंतर सोढीने तिस-यांदा चहलला चॅलेंज केलं पण पुन्हा एकदा चहलने त्याचा फडशा पाडला. चहल आणि सोढीने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. पहिला सामना संपल्यानंतर...तुझं नशीब चांगलं नाहीये असं ट्विट चहलने केलं. त्यानंतर लागोपाठ पराभव झाल्यानंतर सोढीने ट्विट करून ...या सामन्यातही तोच निकाल लागला...तु चेस चॅम्पियन आहेस हे मान्य करावंच लागेल असं म्हटलं. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही दोघं चेस खेळत होते अशी माहिती आहे.
27 वर्षीय चहल क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी चेसमध्ये आंतरराष्ट्रीय स्थरावर भारतासाठी खेळला आहे. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून त्याला चेस आणि क्रिकेटची आवड होती. तो अंडर-12 नॅशनल चेस चॅम्पियन राहिला आहे.