Chahal Dhanashree Divorce Case: टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि मॉडेल अभिनेत्री धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांना आता पूर्णविराम लागल्याचे दिसत आहे. ५ फेब्रुवारीला चहल - धनश्री यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत पुष्टी दिली गेली नव्हती. परंतु आता मात्र या घटनेबाबत नवी माहिती समोर आली आहे. या अपडेटनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) या प्रकरणात हस्तक्षेप करत यांच्या घटस्फोटावर अपेक्षित असलेली प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने यांच्या घटस्फोटातील पोटगीची रक्कम आणि 'कुलिंग ऑफ पिरेड' याबाबतही स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोर्टाने काय दिला निकाल?
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, चहल-धनश्रीने कौटुंबिक न्यायालयात केलेली घटस्फोटाची याचिका काही कारणास्तव फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. यावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या कोर्टात आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. तसेच सहा महिन्यांचा 'कुलिंग ऑफ पिरेड' रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले. गेली अडीच वर्षे धनश्री आणि चहल एकमेकांपासून विभक्त राहत असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अनिवार्य असलेला सहा महिन्यांचा 'कुलिंग ऑफ पिरेड' रद्द करण्याचे निर्देश दिले. तसेच, चहलच्या IPL सहभागाचा विचार करता, या जोडप्याच्या घटस्फोटाबाबत गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय घेऊन त्याला 'घटस्फोटाचा जाहीरनामा' ( Divorce Decree ) दिला जावा असेही सांगण्यात आले.
किती रुपये पोटगी दिली जाणार?
युजवेंद्र चहल याने घटस्फोटाच्या अर्जाच्यावेळीच ४ कोटी ७५ लाखांची पोटगी देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. या मुद्द्यावर न्यायालयाने होकार दर्शवला आणि दोन्ही बाजूंच्या सामंजस्याने म्युच्यूअल घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाला दिले. मिळालेल्या माहितीनुसार, ४.७५ कोटींच्या एकूण पोटगीपैकी २.३७ कोटींची पोटगी आधीच धनश्रीला ट्रान्सफर करून झाली असल्याचे म्हटले आहे. तर उर्वरित पोटगीची रक्कम घटस्फोटाचा जाहीरनामा मिळाल्यानंतर देण्याची तजवीज समुपदेशकाच्या मध्यस्थी करण्यात दिली.
घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्माचा स्टनिंग लूक, पाहा लेटेस्ट फोटोशूट!
आधी कौंटुबिक न्यायालयात काय झालं होतं?
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, युजवेंद्र चहल - धनश्री वर्मा प्रकरणातील ताज्या अपडेटनुसार, या दोघांनी ५ फेब्रुवारी २०२५ ला मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या अर्जामध्ये त्यांनी घटस्फोटाच्या आधी असलेला सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ पिरेड रद्द करण्यात यावा, अशी विनंती कोर्टाला केली होती. तसेच चहल घटस्फोटानंतर धनश्री वर्मा हिला ४.७५ कोटींची पोटगी देण्यास तयार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. परंतु कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाबाबतच्या अर्जाला मान्यता दिली नव्हती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता उद्यापर्यंत यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले जाईल आणि युजवेंद्र चहल - धनश्री वर्मा यांचा विवाह कायदेशीररित्या संपुष्टात येईल.
Web Title: Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Case Mumbai High Court orders Family Court to finalize divorce decree by thursday
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.