Yuzvendra Chahal Record MS Dhoni, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला. CSK ने प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीच्या ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाला १५० धावांपर्यंत मजल मारून दिली. यास प्रत्युत्तर देताना यशस्वी जैस्वालचे अर्धशतक आणि आर अश्विनची नाबाद ४० धावांची खेळी याच्या बळावर राजस्थानने विजय मिळवला. या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहल याने अप्रतिम गोलंदाजी करत मोठा पराक्रम केला.
चेन्नईची फलंदाजी सुरू असताना संघाची अवस्था फारशी चांगली नव्हती. मोईन अली वगळता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी उभारता आली नाही. अनुभवी अंबाती रायडू आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांना स्वस्तात तंबूत परतावे लागले. युजवेंद्र चहलने या दोघांना अनुक्रमे ३ आणि २६ धावांवर बाद केले. या दोन विकेट्सच्या मदतीने त्याने मोठा पराक्रम केला. चहलच्या नावावर यंदाच्या हंगामात २६ बळी झाले. एका IPL हंगामात एका स्पिनरने सर्वाधिक बळी मिळवण्याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. त्याने CSK चा माजी फिरकीपटू इमरान ताहिर याच्या IPL 2019 मधील विक्रमाशी बरोबरी केली.
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास राजस्थानच्या संघासाठी शुक्रवारचा विजय हा टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे राजस्थानने चांगली गोलंदाजी केली. पण मोईन अलीच्या फटकेबाजीमुळे त्यांचा सहज विजय मिळवण्याचा प्लॅन फसला. १५१ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने अर्धशतक ठोकत ५९ धावा केल्या. पण तो बाद झाल्यावर मोक्याच्या क्षणी आर अश्विनने (२३ चेंडूत नाबाद ४० धावा) फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.