yuzvendra chahal on rcb : भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने एक मोठे विधान करून क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) फ्रँचायझीने आठ वर्षे संघाचा भाग असताना देखील आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी संघातून रिलीज केले ते पाहून धक्का बसल्याचे चहलने म्हटले. "नक्कीच मला खूप वाईट वाटले. माझा प्रवास आरसीबीपासून सुरू झाला होता. मी त्यांच्या संघासोबत आठ वर्षे घालवली. आरसीबीने मला संधी दिली आणि त्याच्यामुळे मला भारतीय संघात स्थान मिळाले. विराट भैय्याने पहिल्या सामन्यापासूनच माझ्यावर विश्वास दाखवला, वाईट वाटले कारण जेव्हा तुम्ही एका संघात ८ वर्षे घालवता तेव्हा ते जवळजवळ कुटुंबासारखे वाटते. पण अचानक मला संघातून बाहेर काढण्यात आले", असे चहलने यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर बोलताना सांगितले.
"मी खूप मोठी रक्कम मागितली होती अशा अफवा पसरवल्या जात होत्या. मी त्यावेळी स्पष्टीकरण दिले होते की असे काहीही नव्हते. मला माहित आहे की मला कोणता अधिकार आहे. मी खरोखर दुखावलो गेलो कारण मला एकही कॉल न करता संघातून काढण्यात आले. निदान माझ्यासोबत त्यांनी बोलायला हवे होते. कारण मी आरसीबीच्या संघासाठी १४४ सामने खेळले आहेत. लिलावात त्यांनी मला वचन दिले की ते माझ्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील. मी म्हणालो, ठीक आहे. तिथे माझी निवड झाली नाही तेव्हा मला खूप राग आला होता. मी त्यांना आठ वर्षे दिली. चिन्नस्वामी माझे आवडते मैदान होते", असा खुलासा चहलने केला.
"जे झालं ते चांगल्यासाठीच"युझवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये १८७ विकेट्ससह सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाचा हिस्सा झाल्यानंतर चहलने आनंद व्यक्त केला. त्याने म्हटले, "राजस्थान रॉयल्समध्ये आल्यापासून डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केल्याने एक गोलंदाज म्हणून सुधारणा झाली. लिलावात आरसीबीच्या संघाने मला रिलीज केल्याने वाईट वाटले पण नंतर त्याचा फायदा देखील झाला. त्यामुळे जे घडते ते चांगल्यासाठीच घडते यावर मी विश्वास ठेवला. आरसीबीमध्ये असताना अनेकदा माझी चार षटके १६ षटकांपूर्वी पूर्ण व्हायची. पण राजस्थानच्या संघात मला अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, त्यामुळे एक गोलंदाज म्हणून माझ्यात सुधारणा होत आहे."