नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताच्या युवा ब्रिगेडने विजयी सलामी दिली. खरं तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या मालिकेसाठी अनेक नव्या चेहऱ्यांना टीम इंडियात संधी मिळाली आहे. पण, फिरकीपटू युझवेंद्र चहलला पुन्हा एकदा डावलल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. आता खुद्द चहलने मनातील भावना व्यक्त करताना सोशल मीडियावर एक बोलका फोटो शेअर केला. चहलने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफी २०२३ मध्ये हरयाणाकडून खेळताना उत्तराखंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चहलसाठी हा सामना खास होता कारण त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०० बळी घेण्याची किमया साधली. या सामन्यात युझीने सहा बळी घेऊन 'सामनावी'रचा पुरस्कार पटकावला.
या पराक्रमानंतर चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. चहलने पोस्टच्या कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले, "ज्या वेळी लोक तुमच्याबद्दल अनेक गोष्टींचा विचार करत असतील, अशा वेळी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे हे खऱ्या योद्ध्याचे लक्षण आहे." चहलच्या या पोस्टवर त्याची पत्नी धनश्री वर्मा व्यक्त झाली असून आगीचा इमोजी शेअर केला आहे.
दरम्यान, आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या ट्वेंटी-२० मालिकेतून चहलला वगळण्यात आले. भारताच्या आंतरराष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर चहलने आपला मोर्चा देशांतर्गत क्रिकेटकडे वळवला.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.