Join us  

Yuzvendra Chahal Shreyas Iyer, IPL 2022 RR vs KKR: युजवेंद्र चहलचा कोलकाताला हॅटट्रिकसह 'सुपर-पंच'; श्रेयस अय्यरची दणकेबाज खेळी व्यर्थ; राजस्थान ७ धावांनी विजयी

राजस्थानने अटीतटीच्या लढतीत कोलकाताचा ७ धावांनी केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:47 AM

Open in App

Yuzvendra Chahal Shreyas Iyer Jos Buttler, IPL 2022 RR vs KKR: सोमवारी रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघावर रोमहर्षक विजय मिळवला. जोस बटलरच्या दमदार शतकाच्या जोरावर राजस्थानने २० षटकात २१७ धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरने अप्रतिम ८५ धावांची खेळी केली. पण युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी हॅटट्रिक घेत सामना फिरवला. त्यामुळे राजस्थानला ७ धावांनी विजय मिळाला.

कोलकाताने राजस्थानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. सलामीवीर देवदत्त पडिकल २४ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर संजू सॅमसन १९ चेंडूत ३८ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. जोस बटलरने दमदार फलंदाजी करत ५९ चेंडूत शतक ठोकले. तो ६१ चेंडूत १०३ धावांवर बाद झाला. जोस बटलरने तुफान फटकेबाजी करत ९ चौकार आणि ५ षटकारांनी आपली खेळी सजवली. बटलर बाद झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात शिमरॉन हेटमायरने तुफानी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २६ धावा केल्या.

२१८ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा सलामीवीर सुनील नारिन चेंडू न खेळताच धावचीत झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि आरोन फिंच जोडीने दमदार फटकेबाजी केली. या दोघांमध्ये १०७ धावांची भागीदारी झाली. फिंचने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले. तो २८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावांवर बाद झाला. त्यानंतर नितिश राणा (१८), आंद्रे रसल (०), व्यंकटेश अय्यर (६), शेल्डन जॅक्सन (८), शिवम मावी (०), पॅट कमिन्स (०) सर्व फलंदाजांनी घोर निराश केली. श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरू ठेवली. त्याने ५१ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ८५ धावांची खेळी केली. पण युजवेंद्र चहलने श्रेयस, शिवम मावी आणि कमिन्स असे तीन चेंडूत तीन गडी घेत हॅटट्रिक घेतली आणि सामना राजस्थानच्या दिशेने झुकवला. युजवेंद्र चहलने ४ षटकांत ४० धावा देऊन पाच बळी टिपले.

उमेश यादवची दणकेबाज खेळी

चहलने शानदार गोलंदाजी टाकल्यानंतर देखील उमेश यादवने आपल्या बॅटिंगची चमक दाखवली. त्याने ट्रेंट बोल्टच्या एकाच षटकात २ षटकार आणि १ चौकार खेचत सामन्यात कोलकाताचे आव्हान जिवंत ठेवले. शेवटच्या षटकात नवीन गोलंदाज मकॉयने उत्तम गोलंदाजी करत दोन बळी घेतले आणि कोलकाताचा डाव २१० धावांवर संपुष्टात आला. उमेश यादवने ९ चेंडूत २१ धावा कुटल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२युजवेंद्र चहलश्रेयस अय्यरजोस बटलर
Open in App