सेंच्युरियन : वन-डे मालिकेत आफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या यजुवेंद्र चहलची टी-20 सामन्यात चांगलीच पिटाई झाली. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात चहलचा मारा निष्प्रभ दिसला. पहिल्या टी-20 सामन्यात चहलने चार षटकांमध्ये 39 धावा खर्च करताना फक्त एक बळी मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात चार षटकांमध्ये तब्बल 64 धावांची खैरात वाटली. यावेळी त्याला एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. पण चहलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
भारताकडून सर्वाधिक महागडा गोलंदाज म्हणून चहलची आता इतिहासात नोंद झाली. या आधी हा नकोसा विक्रम जोगिंदर शर्मा (57 धावा ) च्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासेन चहलची सर्वाधिक धुलाई केली. चहलच्या चार षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फंलदाजांनी सात षटकार आणि दोन चौकार लगावले. एका टी-20 सामन्यात सर्वाधिक धावाबरोबरच सर्वाधिक षटकारही चहलच्या नावावर आहेत. याआधी हा नकोसा विक्रम रविंद्र जाडेजाच्या नावावर होता. जाडेजाच्या चार षटकांमध्ये सहा षटकार लगावले होते. पण काल झालेल्या सामन्यात चहलच्या षटकांत सात षटकार लगावले गेले.
सर्वाधिक महागडे भारतीय गोलंदाज -
- युजवेंद्र चहल- 64 धावा
- जोगिंदर शर्मा- 57 धावा
- यूसुफ पठान- 54 धावा
- मोहम्मद सिराज- 53 धावा
- आशीष नेहरा- 52 धावा
दरम्यान, हेन्रिक क्लासेन (६९) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (६४*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुस-या टी२० सामन्यात भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. यासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून शनिवारी रंगणार अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी रंगणारा अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल.
धोनीने रचला विक्रम
दुसऱ्या वन-डेत धोनीनं 28 चेंडूत 52 धावा करताना ३ षटकार खेचले. त्यामुळे त्याचे आंतराष्ट्रीय टी -20मध्ये 46 षटकार झाले आहेत. या षटकारांबरोबरच तो यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने ही कामगिरी करताना इंग्लंडच्या जॉस बटलरचा 43 षटकारांचा विक्रम मागे टाकला. यष्टीरक्षक म्हणून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद 68 षटकारांसह अव्वल स्थानी असून त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम 58 षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे.