Yuzvendra Chahal, County Cricket Championship: अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलला टीम इंडियाकडून बऱ्याच दिवसांपासून एकही सामना खेळता आलेला नाही. पण त्याने इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये मोठी कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून ( Northamptonshire ) खेळताना त्याने शानदार गोलंदाजी केली. डर्बीशायर विरुद्ध ९ विकेट्स घेत त्याने आपल्या संघाला १३३ धावांनी विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात त्याने ९९ धावांत ९ बळी घेतले. त्याची आतापर्यंतची कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. सामन्यात चहलने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत १०० बळींचा टप्पाही गाठला.
----
चहलने जिंकवला सामना
चहलच्या कामगिरीमुळे नॉर्थम्प्टनशायरने या मोसमात काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पहिला विजय नोंदवला. युझवेंद्र चहलने पहिल्या डावात ४५ धावांत ५ बळी घेतले. तर दुसऱ्या डावात ५४ धावांत ४ बळी घेतले. नॉर्थम्प्टनशायरच्या फलंदाजांच्या अपयशानंतरही चहलच्या दमदार गोलंदाजीमुळे संघाने अवघ्या ३ दिवसांत १३३ धावांनी मोठा विजय नोंदवला. त्याचा संघ पहिल्या डावात अवघ्या २१९ धावांत सर्वबाद झाला होता. त्यानंतर चहलने ५ बळी घेत डर्बीशायरला बॅकफूटवर ढकलले. चहलच्या गोलंदाजीमुळे नॉर्थम्प्टनशायरच्या संघाला ५४ धावांची आघाडी मिळाली. नॉर्थम्प्टनशायरचे फलंदाज दुसऱ्या डावातही फ्लॉप ठरले. संपूर्ण संघ २११ धावांत ऑलआऊट झाले. पुन्हा चहल मदतीला धावून आला. २६५ धावांचे आव्हान दिलेल्या संघाला रॉबर्ट केओघसह युजवेंद्र चहलने गुडघे टेकायला भाग पाडले. या दोघांनी ९८ धावांत ९ बळी घेत नॉर्थम्प्टनशायरला १३३ धावांनी विजय मिळवून दिला.
चहलसाठी टीम इंडियाचं दार कधी उघडणार?
युझवेंद्र चहलला भारताने कसोटीची संधी दिली नाही. पण इंग्लंडमध्ये त्याने मोठी किमया साधली. संपूर्ण सामन्यात ९९ धावांत ९ बळी घेत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी बजावली. यासोबतच चहलने ३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण १०६ विकेट्स घेतल्या असून तो टीम इंडियाच्या कसोटी संघात संधीची वाट पाहत आहे. एवढी चांगली गोलंदाजी करूनही त्याला अद्यापही टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करता आलेले नाही.