मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियनच्या युवराज सिंगची फटकेबाजी पाहायला मिळाली. या सामन्यात युझवेंद्र चहलनं टाकलेल्या 14 व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर षटकार ठोकले. युवराजचा हा आक्रमक अवतार पाहून आज माझा स्टुअर्ट ब्रॉड होतोय की काय, असा प्रश्न मनात येऊन गेला, असं चहलनं सांगितलं. मुंबईनं हा सामना सहा धावांनी जिंकत मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली.
'जेव्हा युवराजनं सलग तीन षटकार मारले, तेव्हा मला स्टुअर्ट ब्रॉड झाल्यासारखं वाटू लागलं,' असं चहल म्हणाला. 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत युवराजनं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते. त्यामुळेच आता आपला पण ब्रॉड होणार की काय, असा प्रश्न चहलच्या मनात आला. मात्र त्यानं चौथ्या चेंडूवर युवराजला बाद केलं. युवराज हा चेंडूदेखील थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावणार होता. मात्र सीमारेषेवर मोहम्मद सिराजनं त्याचा सुंदर झेल टिपला आणि तो 12 चेंडूत 23 धावा काढून बाद झाला.
'तुम्हाला माहितीय तो एक दिग्गज फलंदाज आहे. त्यामुळे मी स्वत:लाच विश्वास दिला. मला चेंडू पुढे टाकावा लागणार होता. त्यामुळे कदाचित युवराजला बाद करता येऊ शकेल, असा विचार डोक्यात आला. मी माझ्या भात्यातील उत्तम अस्त्रांचा वापर केला. मात्र त्यानं षटकार ठोकले. अशा परिस्थितीत तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे मग त्याच्यापासून थोडा लांब पडेल असा गुगली टाकला आणि अखेर जीव भांड्यात पडला,' अशा शब्दांमध्ये चहलनं सामन्यातील नाट्यमय क्षण उलगडून सांगितला.
युवराज सिंगनं 19 सप्टेंबर 2007 रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर घणाघाती हल्ला चढवला. त्याआधी युवराजचा अँड्र्यू फ्लिंटॉफसोबत वाद झाला. या वादाचा फटका ब्रॉडला बसला. युवराज ब्रॉडच्या गोलंदाजीवर तुटून पडला. त्यानं चौफेर फटकेबाजी केली. या सामन्यात युवराजनं 16 चेंडूंमध्ये 58 धावांची तुफानी खेळी साकारली.
Web Title: Yuzvendra Chahal says he felt like Stuart Broad when Yuvraj hits 3 consecutive sixes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.