आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. लवकरच आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील तीन सामने झाले असून यजमान भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने तिसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी करून ऐतिहासिक कामगिरी केली. कसोटीच्या एका डावात सर्वाधिक १२ षटकार ठोकण्याच्या बाबतीत त्याने वसीम अक्रमच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे.
यशस्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाचा भाग आहे. यशस्वीचा जबरदस्त फॉर्म पाहता त्याचा सहकारी युझवेंद्र चहलने एक मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीने चहलचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चहलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो म्हणतो की, आयपीएलमध्ये मी आणि यशस्वी जैस्वाल सलामीवीर म्हणून खेळू. तेव्हा ६ षटकांत आम्ही १२० धावा काढू. आम्ही सलामीला गेल्यावर जोस बटलर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघाचा भाग असेल.
दरम्यान, चहलला त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखले जाते. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीचे माजी क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी चहलबद्दल मोठे विधान केले. युजवेंद्र चहल हा RCBच्या अव्वल पाच खेळाडूंपैकी एक असल्याचे हेसन यांनी म्हटले. २०२१ मध्ये त्याने अविश्वसनीय कामगिरी केली होती, परंतु तरीही आयपीएल २०२२ पूर्वी त्याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला. आयपीएल २०२१ मध्ये त्याने ७.०५ च्या इकॉनॉमीने १८ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्या पर्वात तो दुसरा सर्वोत्तम गोलंदाज होता.
चहल राजस्थानच्या ताफ्यात
२०२२ हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझींना फक्त ३ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती आणि RCB ने विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी) आणि मोहम्मद सिराज (७ कोटी) या तीन खेळाडूंनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. चहल ऑक्शनमध्ये मोठी बोली लावून RCB पुन्हा आपल्या ताफ्यात घेईल असे अनेकांना वाटले होते. पण, त्यांनी त्याच्यासाठी बोलीच लावली नाही आणि राजस्थान रॉयल्सने ६.५० कोटींत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
Web Title: Yuzvendra Chahal says that I and Yashasvi Jaiswal will open and Jos Buttler will play as an impact player
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.