नवी दिल्ली : सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान संघाने मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित सेनेने 4 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग टीम इंडियाने 43.2 षटकांत 6 बाद 219 धावा करून पूर्ण केला.
मालिकेतील अखेरचा सामना 15 जानेवारी रोजी रविवारी त्रिवेंद्रम येथे होणार आहे. याच सामन्याच्या तोंडावर भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने कुलदीप यादवची एक खास मुलाखत घेतली, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. खरं तर दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळी केली. कुलदीप यादव (3), मोहम्मद सिराज (3), उमरान मलिक (2) आणि अक्षर पटेलला (1) बळी घेण्यात यश आले.
चहलने घेतील कुलदीपची फिरकी तिसऱ्या सामन्यातील 3 बळींसह कुलदीप यादवने आपल्या कारकिर्दीतील 200 बळी पूर्ण केले. या शानदार कामगिरीमुळे युझवेंद्र चहलने कुलदीपचे खास कौतुक केले. युझवेंद्र चहलने चहल टीव्हीवरून मुलाखत घेताना म्हटले, "कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन." यावर बोलताना कुलदीपने म्हटले, "हा मोठा टास्क आहे, 200 बळी घेणे म्हणजे मोठी गोष्ट असून याचा मला अभिमान वाटतो." तसेच कुलदीपने फलंदाजी करताना एक चौकार ठोकला ज्यामुळे चहलने त्याची फिरकी घेताना हसत-हसत म्हटले, "सूर्याचा मी फलंदाजी प्रशिक्षक होतो आता कुलदीप यादवचा गोलंदाजी प्रशिक्षक देखील झालो आहे."
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"