नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. कधी मैदानावर तर कधी ड्रेसिंग रूममध्ये तो विनोद करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. आता पुन्हा एकदा चहल खूप चर्चेत आला आहे. कारण चहलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे आणि याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मात्र चहलचे अकाउंट हॅक झाल्याने आयपीएलची फ्रॅंचायझी राजस्थान रॉयल्सने मजेशीर इमोजी शेअर करून त्याची मजा घेतली आहे.
पत्नीसोबतची चॅट झाली लीक
राजस्थान रॉयल्सने चहलचे अकाउंट हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर करून त्याला डिवचले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तुम्ही जेवढा गंभीरपणे विचार करत आहात तसे काही नाही. कारण राजस्थानच्या फ्रँचायझीने चहलची मजा घेण्यासाठी असे ट्विट केले आहे. फोटोमध्ये चहलने त्याची पत्नी धनश्री, संजू सॅमसन, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहिथ शर्मा आणि जोस बटलर यांच्याशी चॅटिंग केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच भारतीय संघातील काही खेळाडूंना देखील टॅग करण्यात आले आहे.
राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये चहलने त्याची पत्नी धनश्रीसोबत केलेली शेवटची चॅटिंग दिसत आहे. "तुम्ही पुन्हा आमच्या व्हिडीओमध्ये आला" असा मेसेज धनश्रीने केला आहे. धोनीने त्याचे अभिनंदन केले आहे तर रोहित शर्माने अकाउंट डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएलच्या मागील हंगामातील ऑरेंज कॅप विजेता जोस बटलरने चहलला ऑरेंज कॅप परत करण्यास सांगितले आहे. "चहलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, हिशोब बरोबर", असे भन्नाट कॅप्शन लिहून राजस्थानच्या फ्रँचायझीने फोटो शेअर केला आहे.
राजस्थानच्या पोस्टची रंगली चर्चा
काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १५ वा हंगाम पार पडला ज्या हंगामात चहल राजस्थानच्या फ्रँचायझीचा हिस्सा राहिला आहे. तेव्हा चहलने राजस्थान रॉयल्सचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते, हे काम करण्याआधी त्यानेच आपण अकाउंट हॅक करत असल्याचे सांगितले होते. अकाउंट हॅक केल्यानंतर चहलने स्वत:ला संघाचा कर्णधार घोषित केले आणि कर्णधार संजू सॅमसनने देखील त्याचे अभिनंदन केले होते. मात्र ही मस्ती चहलने केल्याचे नंतर समोर आले. पण आता ज्या प्रकारे राजस्थान रॉयल्सने त्याचा बदला घेतला आहे, ते पाहून चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला आहे.
Web Title: Yuzvendra Chahal's Instagram account has been hacked and his chat with his wife Dhanshree is going viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.