पुणे : कोणाला दुखापत झाली, काय करावं हे सुचत नसेल, इतरही कोणता विषय असेल तर भारतीय संघामधील आम्ही सर्व जण झहीर खानकडे जायचो, कारण तो जवळपास प्रत्येक समस्येत योग्य सल्ला देऊन त्याचे निराकरण करायचा. यामुळे आम्ही आजही त्याला ‘आयडियावाला बाबा’ म्हणतो, असे क्रिकेटपटू युवराजसिंग याने रविवारी पुण्यात सांगितले.‘रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१’ यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशिपमध्ये ‘अध्याय १८’ या वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली. तिचा समारोप झहीर आणि युवराज या दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलाखतीने झाला. जहीर व युवराज यांनी आपल्या मैत्रीचा आणि कारकीर्दीचा प्रवास या वेळी उलगडला. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ व दीपा गाडगीळ यावेळी उपस्थित होते.विक्रम साठ्ये यांनी ही मुलाखत घेतली. यात झहीरसोबतचे मैत्रीचे नाते उलगडताना युवी म्हणाला, ‘‘२०११च्या विश्वचषकादरम्यान एका सामन्यापूर्वी मी मानदुखीने त्रस्त होतो. तो सामना न खेळण्याच्या निर्णयाप्रत मी आलो होतो. एखाद्या मित्राला विचारले असते तर त्याने विश्रांती घेण्याचा किंवा डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला असता. मात्र, झहीरकडे गेल्यावर त्याने मला प्रोत्साहन दिले आणि सामना खेळण्यासाठी प्रवृत्त केले. त्या सामन्यात विश्वचषकातील पहिले अर्धशतक झाले. त्यासाठी आजही मी त्याचा आभारी आहे.’’गोलंदाजी करताना आपल्या क्षमतेबरोबरच प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या मनात काय सुरू असेल, याचा योग्य अंदाज लावणे हेदेखील यश मिळविण्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे झहीरने नमूद केले. तो म्हणाला, ‘‘समोरच्या फलंदाजाच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला समजायला हवं ते समजलं तर तुम्ही त्याला नक्की बाद करू शकता. त्याचे कच्चे दुवेदेखील तुम्हाला माहित असायला हवे. मी नेमके तेच साधायचा प्रयत्न करायचो. हे करीत असताना अनेकदा मी समोरच्या फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचो. असे करताना फलंदाज काही चुका करायचा आणि मला त्याचा फायदा मिळायचा.’’ दुखापत हा आयुष्याचा एक भाग आहे, हे वास्तव खेळाडूंनी स्वीकारायला हवे. म्हणजे त्यातून मार्ग काढणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सोपे होते, असेही झहीरने आवर्जुन सांगितले.सचिन तेंडुलकर झहीरला ‘इंटलेक्चुअल बॉलर’ म्हणत असल्याचे नमूद करून युवराज म्हणाला, ‘‘झहीर फलंदाजाचा योग्य अंदाज लावत गोलंदाजी करतो. यामुळे तो सर्वोत्तम गोलंदाज ठरतो. त्याने इतरांना दिलेला सल्ला नेहमीच उपयोगी ठरला आहे.’’गंभीर आजारातून सावरण्यासाठी श्रद्धा महत्त्वाचीदुखापती मधून बाहेर येणं हे एकवेळ सोपे असते मात्र, गंभीर आजारातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला श्रद्धा ठेवावी लागते. अशा आजारातून केवळ शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणे जास्त महत्त्वाचे असतात. मीकॅ न्सरसारखा आजार स्वीकारत त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला. हे करीत असताना मी मनात श्रद्धा बाळगली आणि त्यामुळेच पुन्हा मैदानावर उतरू शकलो, असे अनुभवाचे बोल सांगताना युवराज भावुक झाला होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- झहीर हा भारतीय क्रिकेट संघासाठी आयडियावाला बाबा : युवी
झहीर हा भारतीय क्रिकेट संघासाठी आयडियावाला बाबा : युवी
कोणाला दुखापत झाली, काय करावं हे सुचत नसेल, इतरही कोणता विषय असेल तर भारतीय संघामधील आम्ही सर्व जण झहीर खानकडे जायचो, कारण तो जवळपास प्रत्येक समस्येत योग्य सल्ला देऊन त्याचे निराकरण करायचा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 6:15 AM