लंडन : ‘रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू अॅडम झम्पा याने ऊब घेण्यासाठी (गरम करण्यासाठी) हात पँटच्या खिशात घातले होते,’ असे स्पष्टीकरण आॅस्टेÑलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याने दिले. झम्पा चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आॅस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यावर कर्णधार अॅरोन फिंच याला स्पष्टीकरण द्यावे लागले.
झम्पाची काही छायाचित्रे प्रकाशित झाली. त्यात तो चेंडू टाकण्याआधी पँटच्या खिशात हात घालताना दिसतो. त्यामुळेच सोशल मीडियावर चेंडू कुरतडण्याच्या चर्चेला पेव फुटले होते. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे मागच्यावर्षी द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी ठरले होते. दोघांना वर्षभराच्या बंदीचा सामना करावा लागला. भारताविरुद्धही असाच प्रसंग या संघावर ओढवला. त्यावर पराभवानंतर फिंचने स्पष्टीकरण दिले.फिंच म्हणाला, ‘मी छायाचित्रे पाहिलेली नाहीत, पण झम्पा हात गरम करण्यासाठी खिशात टाकत होता, हे सांगू शकतो. झम्पा स्वत:कडे ‘हॅन्डवॉर्मर’ ठेवतो. मी छायाचित्र न पाहिल्याने काही भाष्य करू शकत नाही. पण प्रत्येक सामन्यादरम्यान त्याच्याकडे हॅन्डवॉर्मर असते.’इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने देखील झम्पाचा बचाव केला. टिष्ट्वट करीत पीटरसन म्हणाला,‘इंग्लंडमध्ये थंडी असते तेव्हा प्रत्येक खेळाडू हात गरम करण्यासाठी स्वत:कडे हॅन्डवॉर्मर ठेवतो. क्षेत्ररक्षणादरम्यान खेळाडू संपूर्ण वेळ खिशात घालून असतो. झम्पा असेच करीत होता, यात विशेष काहीही नाही.’