ख्राईस्टचर्च - बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिका १-१ अशा बरोबरीत सुटली. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या बांगलादेशचा दुसऱ्या कसोटीत डावाने विजय मिळवला. दरम्यान, पहिल्या कसोटीतील बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरलेला वेगवान गोलंदाज इबादत हुसेन याच्या नावावर फलंदाजीतील एक नकोसा विक्रम नोंदला गेला आहे.
इबादत हुसेन कसोटीमधील मागच्या सलग १० डावांमध्ये एकही डाव काढू शकलेला नाही. मागच्या दहा डावांमध्ये तो सात वेळा शुन्यावर नाबाद राहिला. तर तीनवेळा तो शून्यावर बाद झाला. अशा प्रकारचा एक विचित्र विक्रम करणारा तो कसोटी क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे.
तसेच इबादत हुसेनची गेल्या तीन वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीतील कामगिरी ही यथातथाच झाली आहे. त्याने गेल्या ३ वर्षांमधील १२ कसोटी सामन्यांच्या १७ डावांमध्ये त्याला केवळ ४ धावाच जमवता आल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ही २ आहे. यापूर्वी ख्रिस मार्टिन आणि लाहिरू कुमार यांनी ९ डावांमध्ये शून्य धावा काढण्याचा विक्रम केला होता.
दरम्यान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंडने एक डाव आणि ११७ धावांनी विजय मिळवला आहे. त्याबरोबरच न्यूझीलंडने ही मालिका १-१ अशा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. न्यूझीलंडने पहिल्या डावात ५२१ धावा कुटल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १२६ धावांत गडगडला. तर दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव २७८ धावांत आटोपला.