ZIM vs IND 1st T20I Live : नवख्या झिम्बाब्वेने विश्वविजेत्या भारताचा पराभव करताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. अवघ्या ११६ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला अपयश आले. भारताचा पराभव होताच काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) बोचरी टीका केली. अहंकारामुळे संघाचा पराभव झाला असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिलाच सामना अटीतटीचा झाला. भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.
झिम्बाब्वेच्या नवख्या संघाने कडवी झुंज देताना भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेने दिलेल्या ११६ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अपयश आले. पदार्पणाचा सामना खेळत असलेला अभिषेक शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. मग ऋतुराज गायकवाडच्या रूपात भारताला दुसरा झटका बसला. टीम इंडियाकडून शुबमन गिल वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही, गिलने २९ चेंडूत सर्वाधिक ३१ धावा केल्या. अखेर भारत १९.५ षटकांत अवघ्या १०२ धावांत सर्वबाद झाला अन् १३ धावांनी सामना गमावला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून शशी थरूर यांनी म्हटले की, नुकताच मुंबईत विश्वविजेत्या भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. तो आवाज अद्याप कमी झालेला नसताना हरारे येथे आपल्याला झिम्बाब्वेसारख्या नवख्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. यावरून एक स्पष्ट होते की, बीसीसीआय फक्त गोष्टी गृहीत धरण्यासाठी पात्र आहे. चार जून असो वा सहा जुलै. अहकांराला पायबंद बसला आहे. झिम्बाब्वेचा संघ चांगला खेळला.
यजमान संघाच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचा कोणताच शिलेदार टिकला नाही. भारताकडून अभिषेक शर्मा (०), शुबमन गिल (३१), ऋतुराज गायकवाड (७), रियान पराग (२), रिंकू सिंग (०), ध्रुव जुरेल (६), आवेश खान (१६), मुकेश कुमार (०) आणि वॉशिंग्टन सुंदर (२७) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर तेंदई चतारा (२), ब्रायन बेनेट, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे आणि ब्लेसिंग मुजारबानी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.