Join us  

८ सिक्स! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती शतक; अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला

ZIM vs IND 2nd T20I Match Live : आज झिम्बाब्वे आणि भारत यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 5:34 PM

Open in App

ZIM vs IND 2nd T20I Match Live Updates | हरारे : पहिल्या सामन्यात पराभूत झालेली टीम इंडिया आज मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने मैदानात आहे. आज भारत आणि झिम्बाब्बे यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. कर्णधार शुबमन गिल (२) स्वस्तात बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी मोर्चा सांभाळला. स्फोटक खेळी करत असलेल्या अभिषेकला ऋतुराजने संथ खेळी करून चांगली साथ दिली. अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४६ चेंडूत शतक झळकावले. अभिषेकने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या १३ चेंडूत शतकाला गवसणी घातली. विशेष बाब म्हणजे षटकारांची हॅटट्रिक मारून अभिषेक शर्माने त्याचे पहिले शतक पूर्ण केले. 

झंझावाती शतक झळकावून अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अभिषेकने गायकवाडसोबत दुसऱ्या गड्यासाठी १३७ धावांची भागीदारी नोंदवली. 

झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारताच्या युवा ब्रिगेडला सलामीच्या सामन्यात १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. शुबमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघ पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी झिम्बाब्बे दौऱ्यावर आहे. आज या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना जिंकून यजमानांनी विजयी सलामी दिली आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधणार का हे पाहण्याजोगे असेल. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जात आहेत. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून साई सुदर्शन भारतीय संघात पदार्पण केले.  

दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेक शर्माने स्फोटक खेळी केली होती. आयपीएल २०२४ मध्ये त्याने स्फोटक खेळी करताना त्याने २०४.२१ च्या स्ट्राईक रेटने १६ सामन्यांत ४८४ धावा कुटल्या. त्याने एका हंगामात ४२ षटकार मारण्याची किमया साधली. 

भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन (पदार्पण), रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

झिम्बाब्वेचा संघ -सिकंदर रझा (कर्णधार), तदीवानाशे मारूमानी, इनोसेंट कॅया, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जॉनथन कँपबेल, क्लाइव्ह मंडे, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चतारा.

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ