Join us  

ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस

abhishek sharma innings against zimbabwe video : अभिषेक शर्माने त्याच्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 6:22 PM

Open in App

ZIM vs IND 2nd T20I Match Live Updates | हरारे : आयपीएलमध्ये स्फोटक खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अभिषेकने सातत्यपूर्ण कामगिरी केली. यामुळेच त्याला भारतीय संघाचे तिकीट मिळाले. सध्या भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. सलामीच्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात रूद्रावतार दाखवला. त्याने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावून क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. 

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमक दाखवली. अभिषेक शर्माचे झंझावाती शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या संयमी खेळीने झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर उभारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद २३४ धावा केल्या. अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४६ चेंडूत शतक झळकावले. अभिषेकने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या १३ चेंडूत शतकाला गवसणी घातली. विशेष बाब म्हणजे षटकारांची हॅटट्रिक मारून अभिषेक शर्माने त्याचे पहिले शतक पूर्ण केले.

झंझावाती शतक झळकावून अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अभिषेकने गायकवाडसोबत दुसऱ्या गड्यासाठी १३७ धावांची भागीदारी नोंदवली. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने सुरुवातीला संथ गतीने धावा केल्या. मग त्याच्या गाडीने वेग पकडताना धावगती वाढवली. ऋतुराज ४७ चेंडूत ७७ धावा करून नाबाद परतला, त्याला ११ चौकार आणि १ षटकार मारण्यात यश आले. अखेरच्या काही षटकारांमध्ये रिंकू सिंगने स्फोटक खेळी केली. त्याने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूत ४८ धावांची शानदार खेळी केली. ऋतुराज आणि रिंकू ही जोडी नाबाद परतली. विशेष बाब म्हणजे भारताने शेवटच्या १० षटकांत १ गडी गमावून तब्बल १६० धावा कुटल्या. 

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेभारतीय क्रिकेट संघऋतुराज गायकवाडटी-20 क्रिकेट