ZIM vs IND 2nd T20I Match Live Updates | हरारे : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमक दाखवली. अभिषेक शर्माचे झंझावाती शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या संयमी खेळीने झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर उभारला. पहिल्या सामन्यात पराभूत झालेली टीम इंडिया आज मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने मैदानात आहे. आज भारत आणि झिम्बाब्बे यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. कर्णधार शुबमन गिल (२) स्वस्तात बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी मोर्चा सांभाळला. स्फोटक खेळी करत असलेल्या अभिषेकला ऋतुराजने संथ खेळी करून चांगली साथ दिली. अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४६ चेंडूत शतक झळकावले. अभिषेकने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या १३ चेंडूत शतकाला गवसणी घातली. विशेष बाब म्हणजे षटकारांची हॅटट्रिक मारून अभिषेक शर्माने त्याचे पहिले शतक पूर्ण केले.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत २ बाद २३४ धावा केल्या. झंझावाती शतक झळकावून अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अभिषेकने गायकवाडसोबत दुसऱ्या गड्यासाठी १३७ धावांची भागीदारी नोंदवली.
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने सुरुवातीला संथ गतीने धावा केल्या. मग त्याच्या गाडीने वेग पकडताना धावगती वाढवली. ऋतुराज ४७ चेंडूत ७७ धावा करून नाबाद परतला, त्याला ११ चौकार आणि १ षटकार मारण्यात यश आले. अखेरच्या काही षटकारांमध्ये रिंकू सिंगने स्फोटक खेळी केली. त्याने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूत ४८ धावांची शानदार खेळी केली. ऋतुराज आणि रिंकू ही जोडी नाबाद परतली. विशेष बाब म्हणजे भारताने शेवटच्या १० षटकांत १ गडी गमावून तब्बल १६० धावा कुटल्या.
भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन (पदार्पण), रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
झिम्बाब्वेचा संघ -सिकंदर रझा (कर्णधार), तदीवानाशे मारूमानी, इनोसेंट कॅया, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जॉनथन कँपबेल, क्लाइव्ह मंडे, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चतारा.