Join us  

ZIM vs IND Live : कर्णधार गिलची अखेर 'यशस्वी' खेळी; मग मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा रूद्रावतार

ZIM vs IND 3rd T20 Live Match : भारताने झिम्बाब्वेसमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 5:56 PM

Open in App

ZIM vs IND 3rd T20 Live Match Updates In Marathi | हरारे : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात बदल पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. मागील सामन्यातील शतकवीर अभिषेक शर्मा आज तिसऱ्या क्रमांकावर खेळला पण तो अवघ्या १० धावा करून तंबूत परतला. गिल (६६) आणि जैस्वाल (३६) यांनी पहिल्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली. मग मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने डाव सांभाळत सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात हातभार लावला. भारताने यजमान झिम्बाब्वेला विजयासाठी १८३ धावांचे तगडे आव्हान दिले.

भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ६६ धावा केल्या. तर यशस्वी जैस्वाल (३६), अभिषेक शर्मा (१०), संजू सॅमसन (नाबाद १२) आणि रिंकू सिंह एक धाव करून नाबाद परतला. ऋतुराज गायकवाडने स्फोटक खेळी करताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ४९ धावा केल्या. अखेर टीम इंडिया निर्धारित २० षटकांत ४ बाद १८२ धावा करू शकली. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.

दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात ११५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अपयश आले. मग यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माने शतकी खेळी केली, त्याला ऋतुराज गायकवाडने चांगली साथ दिली. भारताने झिम्बाब्वेसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना घाम फुटला अन् १०० धावांनी सामना गमावला. 

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेऋतुराज गायकवाडशुभमन गिलटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ