Join us  

धोनीचा शिलेदार! IPL गाजवणारा तुषार; मराठमोळ्या खेळाडूची Team India त एन्ट्री

झिम्बाब्वेविरूद्धच्या चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मराठमोळ्या तुषार देशपांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 4:53 PM

Open in App

Tushar Deshpande news : झिम्बाब्वेविरूद्धच्या चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मराठमोळ्या तुषार देशपांडेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यासह तुषारने भारताच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना तुषारने चमकदार कामगिरी केली. महेंद्रसिंग धोनीचा जवळचा सहकारी म्हणून त्याने ओळख मिळवली. तुषार देशपांडेने त्याची पत्नी नभा गड्डमवारच्या उपस्थितीत पदार्पणाची कॅप स्वीकारली. 

 पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना जिंकून विजयी आघाडी घेण्यासाठी आज भारतीय संघ आज मैदानात आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना जिंकून टीम इंडियाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना यजमान झिम्बाब्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे हा सामना खेळवला जात आहे. आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यात भारताच्या युवा ब्रिगेडला यश मिळते का हे पाहण्याजोगे असेल. तर सिकंदर रझाच्या नेतृत्वातील झिम्बाब्वेसाठी आजची लढत म्हणजे 'करा किंवा मरा' अशी आहे. कारण आजचा पराभव त्यांच्या हातून मालिका हिसकावेल. आजच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, आयपीएलच्या मागील हंगामात तुषार संघर्ष करताना दिसला. पण, तुषार देशपांडेने आयपीएल २०२३ मध्ये CSKसाठी सर्वाधिक बळी घेतले होते. याच वर्षी MS Dhoni च्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवे आयपीएल जेतेपद जिंकले. तुषार देशपांडेने २०२० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आयपीएल २०२३ मध्ये १६ सामन्यांत २१ बळी घेतले. २०२० च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेला तुषार मागील चार हंगामातून चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत दिसत आहे.

भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयपीएल २०२४