Join us  

ZIM vs IND : द संजू सॅमसन शो! भारताचा उपकर्णधार झिम्बाब्वेला भिडला; दुबेही मदतीला धावला

ZIM vs IND 5th T20 Live Match Updates : संजू सॅमसनच्या स्फोटक खेळीने झिम्बाब्वेची पळता भुई थोडी झाली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 6:05 PM

Open in App

ZIM vs IND 5th T20 Live Match Updates । हरारे : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार संजू सॅमसन यजमान संघाला एकटा भिडला. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन भारताने आधीच मालिका खिशात घातली आहे. इतर सर्व फलंदाज संघर्ष करत असताना संजू सॅमसनने मात्र धावांचा पाऊस पाडला. सुरुवातीला संथ मग स्फोटक खेळीने सॅमसनने झिम्बाब्वेसमोर तगडे लक्ष्य उभे केले. 

भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ४५ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्याशिवाय यशस्वी जैस्वाल (१२), शुबमन गिल (१३), अभिषेक शर्मा (१४), रियान पराग (२२), शिवम दुबे (२६) आणि रिंकू सिंग (११) धावा करून नाबाद परतला. अखेर भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १६७ धावा करू शकला. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजारबानीने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर सिकंदर रझा, रिचर्ड नगारवा आणि ब्रँडन मावुता यांना १-१ बळी घेण्यात यश आले.

खरे तर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर १३ धावा करणारा यशस्वी जैस्वाल हा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. हा नो-बॉल असल्याने जैस्वालला फ्री हिटच्या रूपात आयती संधी मिळाली. मग आणखी एक षटकार मारून यशस्वीने एका चेंडूत १३ धावांची नोंद केली. पण, ज्या सिकंदरविरूद्ध यशस्वीने ऐतिहासिक कामगिरी केली त्याच जैस्वालला बाद करण्यात प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला यश आले. तो ५ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १२ धावा करून बाद झाला.

मालिकेतील सलामीचा सामना जिंकून यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर विजयाची हॅटट्रिक मारून भारताने मालिका खिशात घातली. अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावण्याची किमया साधली. 

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेसंजू सॅमसनभारतीय क्रिकेट संघ