ZIM vs IND T20 Series : भारताची युवा ब्रिगेड सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना जिंकून यजमानांनी विजयी सलामी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने १०० धावांनी मोठा विजय मिळवला. अभिषेक शर्माची शतकी खेळी आणि मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या अप्रतिम खेळीने टीम इंडियाला तारले. याचा फायदा ऋतुराजला आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत झाला आहे. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत १३ पावलांनी मोठी झेप घेत सातवे स्थान गाठले. झिम्बाब्वेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत ७७ धावांची स्फोटक खेळी केली.
खरे तर ऋतुराज गायकवाड २०व्या स्थानी होता. पण झिम्बाब्वेविरूद्धच्या खेळीमुळे त्याच्या गुणांमध्ये लक्षणीय वाढ झाली. या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऋतुराज, अभिषेक, शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल अशा काही युवा खेळाडूंना आगामी काळात ट्वेंटी-२० मध्ये अधिक संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ साठी राखीव खेळाडू म्हणून गेलेला रिंकू सिंग या मालिकेचा भाग आहे. त्यानेही दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात रूद्रावतार दाखवला. भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत तब्बल २३४ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेविरूद्धच्या दुसऱ्या लढतीत रिंकूने २२ चेंडूत नाबाद ४८ धावा कुटल्या. यासह त्याने आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजाच्या क्रमवारीत ३९वे स्थान पटकावले. अभिषेक शर्माने ४६ चेंडूत शतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली. तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा चौथा खेळाडू ठरला.
जलद शतक झळकावणारे भारतीय शिलेदार
- रोहित शर्मा - ३५ चेंडू
- सूर्यकुमार यादव - ४५ चेंडू
- लोकेश राहुल - ४६ चेंडू
- अभिषेक शर्मा - ४६ चेंडू
- सूर्यकुमार यादव - ४८ चेंडू
- यशस्वी जैस्वाल - ४८ चेंडू