ZIM vs NED Yorker Video: T20 World Cup मधील भारताच्या गटाचे आज सामने रंगले आहेत. भारत-बांगलादेश यांच्यातील सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. त्याआधी झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या दोघांमध्ये सामना रंगला. नेदरलँड्सने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. झिम्बाब्वेने मात्र पाकिस्तानसारख्या तुलनेने बलाढ्य वाटणाऱ्या संघाला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे या सामन्यात झिम्बाब्वेचे पारडे जड मानले जात होते. असे असले तरी झिम्बाब्वेच्या संघाला केवळ ११७ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात झिम्बाब्वेच्या सलामीवीराचा उडालेला त्रिफळा (Paul van Meekeren clean bowled Wesley Madhevere) चर्चेचा विषय ठरला.
झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत मैदान गाठले. त्यांच्या सलामीवीरांनी मोठी धावसंख्या गाठून देण्याची संघाला आशा होती, पण तसे झाले नाही. पहिले षटक झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संयमीपणे खेळून काढले. पण दुसऱ्या षटकात त्यांना पहिला धक्का बसला. Paul van Meekeren या वेगवान गोलंदाजाने आपल्या स्विंगची जादू दाखवत फलंदाजालाही अवाक् केले. त्याने षटकाच्या तिसरा चेंडू फलंदाजाच्या पायात टाकला आणि चेंडू टप्पा पडताच थोडासा स्विंग झाला. फलंदाज क्रीजच्या थोडा बाहेर असल्याने त्याला तो चेंडू यॉर्करसारखा खेळावा लागला. त्याने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि Wesley Madhevere क्लीन बोल्ड झाला.
पहिला धक्का बसल्यानंतर झिम्बाब्वेच्या संघाकडून कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. अनुभवी क्रेग एरविन ३ धावांवर तर रेगिस चकाब्वा ५ धावांवर माघारी परतला. सीन विल्यम्स (२८) आणि सिकंदर रझा (४०) यांनी अनुभव पणाला लावत झुंज दिली. पण त्यांच्यानंतर मिल्टन शुमबा (२), रॅन बर्ल (२), ल्यूक जोंगवे (६), रिचर्ड नगारावा (९), ब्लेसिंग मुजाराबानी (१) यांनी पटापट विकेट्स बहाल केल्या. त्यामुळे त्यांच्या संघाला ११७ धावाच करता आल्या.
Web Title: ZIM vs NED Amazing Yorker by Paul van Meekeren to clean bowled Wesley Madhevere Shocked batsman Video viral T20 World Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.