ZIM vs NED, T20 World Cup 2022: पाकिस्तानसारख्या तुलनने बलाढ्य संघाला मात देत साऱ्यांनाच आश्चर्यचकित करणारा झिम्बाब्वेचा संघ आज स्वत:च नेदरलँड्सकडून पराभूत झाला. नेदरलँड्सने स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नव्हता. झिम्बाब्वेने मात्र पाकिस्तानला हरवले होते. त्यामुळे या सामन्यात झिम्बाब्वेचे पारडे जड मानले जात होते. असे असले तरी झिम्बाब्वेच्या संघाला केवळ ११७ धावांपर्यंतच मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्स ओडाउडच्या अर्धशतकाच्या जोरावर नेदरलँड्सने सामना जिंकला.
११८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना नेदरलँड्सने अत्यंत चांगली सुरूवात केली. स्टीफन मायबर्ग ८ धावांवर बाद झाला. पण नंतर मॅक्स ओडाउड आणि टॉम कूपर यांनी ७३ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. कूपर ३२ धावा काढून माघारी परतला. त्यापाठोपाठ झटपट विकेट्स पडल्या. कॉलीन एकरमन १ धावेवर, स्कॉट एडवर्ड्स ५ धावांवर माघारी परतले. मॅक्स ओडाउडने मात्र दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ४७ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावा कुटल्या. तो बाद झाल्यानंतर बास डी लिडे याने नाबाद १२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकात पहिला गडी गमावला. मधीवीर १ धावा काढून बाद झाला. त्यानंतर झिम्बाब्वेच्या संघाकडून कोणीही मोठी खेळी करू शकले नाही. अनुभवी क्रेग एरविन ३ धावांवर तर रेगिस चकाब्वा ५ धावांवर माघारी परतला. सीन विल्यम्स (२८) आणि सिकंदर रझा (४०) यांनी अनुभव पणाला लावत झुंज दिली. पण त्यांच्यानंतर मिल्टन शुमबा (२), रॅन बर्ल (२), ल्यूक जोंगवे (६), रिचर्ड नगारावा (९), ब्लेसिंग मुजाराबानी (१) यांनी पटापट विकेट्स बहाल केल्या. त्यामुळे त्यांच्या संघाला ११७ धावाच करता आल्या. मीकरनने सर्वाधिक ३ बळी टिपले.