ICC World Cup Qulifier : झिम्बाब्वेला वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत मंगळवारी स्कॉटलंडकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेला आज विजय मिळवून भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करता आली असती, परंतु आता त्यांचेआव्हान संपुष्टात आले आहे. नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातला विजेता वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित करेल.
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रतेसाठीची एक जागा निश्चित केल्यानंतर दुसऱ्या जागेसाठी झिम्बाब्वे आघाडीवर होते. त्यात स्कॉटलंडविरुद्धची आजची लढत महत्त्वाची होती. नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस्तोफर मॅकब्रीज ( २८) आणि मॅथ्यू क्रॉस ( ३८) यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, तेंदाई चतारा व सीन विलियम्स यांनी या दोघांचीही विकेट घेतली. ब्रेंडन मॅक्म्युलेन ( ३४ ) व जॉर्ज मुन्सी ( ३१) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या विकेटनंतर स्कॉटलंडचा डाव गडगडला. मिचेल लिस्क ( ४८) व मार्क वॅट (२१*) हे दोघं खेळले म्हणून त्यांना ८ बाद २३४ धावांपर्यंत पोहोचता आले. सीन विलियम्सने १०-१-४१-३ अशी स्पेल टाकली.
आतापर्यंत स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या झिम्बाब्वेचीही आज कोंडी झाली. ख्रिस सोलने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ५ षटकांत २० धावांत ३ विकेट्स घेत झिम्बाब्वेला मोठे धक्के दिले. त्यात ब्रेंडनने १ विकेट घेऊन १० षटकांत झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ४१ अशी झाली. सिकंदर रझा हाच झिम्बाब्वेसाठी आशेचा किरण उरला होता. त्याने पाचव्या विकेटसाठी रायन बर्लसह ६१ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी करून संघाला कमबॅक करून दिले. पण, ख्रिस ग्रीव्ह्सने स्कॉटलंडला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. सिकंदर ४० चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह ३४ धावांवर बाद झाला.
IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी; आशिया चषक स्पर्धेसाठी संघ जाहीर, India vs Pakistan लढत या दिवशी
रायन बर्ल खंबीर उभा राहिला आणि त्याने वेस्ली माधेव्हेरेसोबत खिंड लढवली. या दोघांनी ७४ चेंडूंत ७३ धावा जोडल्या. माधेव्हेरे ४० धावांवर पायचीत झाला. या विकेट नंतर झिम्बाब्वेचा डाव गडगडला. बर्ल ८३ धावांवर बाद झाला अन् सामना फिरला. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ २०३ धावांवर तंबूत परतला.