Join us  

ZIM vs IRE: झिम्बाब्वेने आयर्लंडचा 31 धावांनी केला पराभव; सांघिक खेळी करून दिली विजयी सलामी 

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 7:19 PM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. एकीकडे या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत, तर दुसरीकडे सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 8 संघ आमनेसामने आहेत. आज राउंड फेरीतील ब गटातील झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यामध्ये सामना पार पडला. याच गटातील पहिल्या सामन्यात नवख्या स्कॉटलंडने दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली. झिम्बाब्वेने शानदार खेळी करून आयर्लंडवर 31 धावांनी मोठा विजय मिळवला. 

तत्पुर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 174 धावांचा डोंगर उभारला, ज्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाला पूर्णपणे अपयश आले. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 82 धावांची ताबडतोब खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. झिम्बाब्वेला सुरूवातीपासूनच मोठे झटके बसत गेले मात्र रझाने अवघ्या 48 चेंडूत 82 धावा करून डाव सावरला आणि आयर्लंडसमोर विजयासाठी 175 धावांचे तगडे आव्हान ठेवले. आयर्लंडकडून जोशुआ लिटलने सर्वाधिक 3 बळी पटकावले. मार्क अडायर आणि सिमी सिंग यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले. 

आयर्लंडचा 31 धावांनी केला पराभवझिम्बाब्वेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरूवात निराशाजनक झाली. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेर आयर्लंडने 20 षटकांत 9 बाद केवळ 143 धावा केल्या. संघाकडून कर्टिस कॅम्फरने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. झिम्बाब्वेच्या घातक गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी गारद झाली. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजरबानी याने सर्वाधिक 3 बळी पटकावले. रिचर्ड नागरावा आणि तेंडाई चतारा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले तर शॉन विल्यम्स आणि सिकंदर रझा यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. अखेर झिम्बाब्वेने 31 धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली. 

टी-२० विश्वचषकात सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील. 

पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.

ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे. 

सुपर-१२ फेरीगट 1- अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.

गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२झिम्बाब्वेआयर्लंडआॅस्ट्रेलिया
Open in App