Ricky Ponting, PAK vs ZIM: पाकिस्तानच्या संघाला गुरूवारी एका धक्कादायक निकालाचा सामना करावा लागला. भारताने पराभूत केल्यानंतर संघ रूळावर आणण्याचे आव्हान पाकिस्तानच्या बाबर आझमकडे होते. पण झिम्बाब्वे या तुलनेने कमकुवत संघाने पाकिस्तानवर १ धावेने थरारक विजय मिळवला. झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १३० धावा केल्या. सीन विल्यम्सने त्यांच्याकडून ३१ धावांची सर्वोत्तम खेळी केली. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. झिम्बाब्वेच्या विजयाचा शिल्पकार ठरला फिरकीपटू सिकंदर रझा (Sikandar Raza) . त्याने २५ धावांत ३ गडी टिपत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने आपल्या चांगल्या कामगिरीचे श्रेय ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉन्टींगला दिले.
१३० धावांच्या अतिशय माफक आव्हानाचा बचाव करताना सिकंदर रझाने तंत्रशुद्ध गोलंदाजी केली. नेत्याने आपल्या चार षटकांत केवळ २५ धावाच दिल्या. त्यातही त्याने मोक्याच्या क्षणी ३ महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. त्यानंतर बोलताना त्याने रिकी पॉन्टींगच्या नावाचा उल्लेख केला. "मी आता जी कामगिरी केली त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडेच शब्द नाहीत. मला आमच्या संघाचा आणि खेळाडूंचा मनापासून अभिमान वाटतो. आज जे घडलं ते खरंच अविश्वसनीय होतं. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत धीर सोडला नाही आणि त्याचेच फळ आम्हाला मिळाले. ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉन्टींगने मला एक व्हिडीओ क्लिप पाठवली होती. त्यात त्यांनी महत्त्वाचा संदेश दिला होता. त्याच व्हिडीओ संदेशामुळे मला प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी त्यांना फोन करून त्यांचे आभार मानणार आहे", असे सिकंदर रझा म्हणाला.
असा रंगला सामना
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा टॉस हरला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी केली. त्यांची सुरूवात चांगली झाली. पण ४२ धावांची सलामी मिळाल्यानंतर त्यांचा डाव गडगडला. सीन विल्यम्सने ३१ धावा करत संघाला शंभरीपार नेले. त्यांनी २० षटकात १३० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानचाही डाव गडगडला. शान मसूद आणि मोहम्मद नवाज या दोघांनी झुंज दिली. शान मसूदने ४४ धावा केल्या तर नवाझने २२ धावा केल्या. पण अखेर सिकंदर रझाच्या फिरकीने पाकिस्तानला पराभवाचे तोंड पहावेच लागले.