ZIM vs AFG Test: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त १२ संघ कसोटी खेळतात. यापैकी भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ सहसा सर्वाधिक कसोटी क्रिकेट खेळतात. पण आता क्रिकेटमध्ये तुलनेने लहान आकाराचे बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे सारखे संघही आता कसोटीला महत्त्व देऊ लागले आहेत. आगामी मालिकेत झिम्बाब्वेचा संघ अफगाणिस्तानशी दोन कसोटी सामने खेळणार आहे. यावेळी तब्बल २८ वर्षांनी एक गोष्ट घडणार आहे.
२८ वर्षांनी घडणार 'ही' गोष्ट
अफगाणिस्तानचा संघ लवकरच झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टी२०, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळवली जाणार आहे. ३ टी२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त झिम्बाब्वे संघ दोन सामने खेळणार आहे. यादरम्यान २८ वर्षांनंतर झिम्बाब्वे संघ बॉक्सिंग डे कसोटी खेळणार आहे. याआधी १९९६ मध्ये त्यांनी आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळली होती.
अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील हे दोन्ही सामने बुलावायो येथे होणार आहेत. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने त्याचे आयोजन करण्यास उत्सुकता व्यक्त केली आहे. याआधी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोन कसोटी अबुधाबीमध्ये खेळले आहेत. दोघांनी १-१ सामना जिंकला होता.
बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय?
सामान्यतः ख्रिसमसच्या एका दिवसानंतर म्हणजेच २६ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे सामना म्हणतात. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सारख्या कॉमनवेल्थ देशांमध्ये हा प्रकार प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळली जाणारी बॉक्सिंग डे कसोटी ही सर्वात लोकप्रिय असते.