ICC World Cup Qualifiers 2023 : भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या उर्वरित दोन स्थानांसाठी सुरू झालेल्या पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेने पहिल्याच सामन्यात दणका उडवून दिला. तेच दुसरीकडे माजी विजेत्या वेस्ट इंडिजला नव्या दमाच्या अमेरिकन संघाने रडकुंडीला आणले. ३७ वर्षीय क्रेग एर्व्हिन ( Craig Ervine) आणि ३६ वर्षीय सीन विलियम्स ( Sean Williams) यांनी शतकी खेळी करताना विक्रमाची नोंद केली.
नेपाळच्या कुशल भुर्तेल आणि आसीफ शेख यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. कुशलने ९५ चेंडूंत १३ चौकार व २ षटकार खेचून ९९ धावांची खेळी केली. कुशलचे शतक हुकल्याने चाहते नक्कीच नाराज झाले असावेत. आसीफनेही १०० चेंडूंत ६६ धावांची खेळी करून कुशलसह पहिल्या विकेटसाठी १७१ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, या दोघांच्या विकेटनंतर नेपाळचा डाव गडगडला. कुशल मल्ला ( ४१) व कर्णधार रोहित पौडेल ( ३१) यांनी चांगली खेळी करून संघाला ८ बाद २९० धावांपर्यंत पोहोचवले. पण, झिम्बाब्वेकडून दोन अनुभवी खेळाडू जबरदस्त खेळले. एर्व्हिनने १२८ चेंडूंत नाबाद १२१ धावा केल्या, तर विलियम्सने ७० चेंडूंत नाबाद १०२ धावा करून तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली. विलियम्सने झिम्बाब्वेकडून सर्वात वेगवान शतक झळकावले. झिम्बाब्वेने ४४.१ षटकांत २ बाद २९१ धावा करून विजय मिळवला.
वेस्ट इंडिजला कडवी टक्कर...
मुख्य फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या माजी विजेत्या वेस्ट इंडिज संघाला पहिल्याच सामन्यात कडवी टक्कर मिळली. अमेरिकेविरुद्धची ही लढत वेस्ट इंडिजने ३९ धावांनी जिंकली, परंतु अमेरिकेच्या गजानंद सिंगने शतक झळकावून सर्वांची मनं जिंकली. वेस्ट इंडिजला ५० षटकंही पूर्ण खेळता आली नाहीत आणि त्यांचा संपूर्ण संघ २९७ धावांत तंबूत परतला. जॉन्सन चार्ल्स ( ६६), कर्णधार शे होप ( ५४), निकोलस पूरन ( ४३), रोस्टन चेस ( ५५) व जेसन होल्डर ( ५६) यांनी चांगली खेळी केली.
अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकर ( ३-५३), कायले फिलिप ( ३-५६) व स्टीव्हन टेलर ( ३-५३) यांनी विंडीजची कोंडी केली. प्रत्युत्तरात अमेरिकेच्या गजानंदने १०९ चेंडूंत नाबाद १०१ धावा केल्या. शायन जहांगिर ( ३९) व नोस्थुश केंजिगे ( ३४) हे वगळता अन्य फलंदाजांना अपयश आले. त्यांना ५० षटकांत ७ बाद २५८ धावाच करता आल्या.