पाकिस्तानचा सलामीवीर सैम आयुब याने बुलावायोच्या मैदानात रंगलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात आपल्या कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक झळकावलं आहे. दमदार शतकाच्या जोरावर त्याने संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. एवढेच नाही तर त्याने शाहिद आफ्रिदीच्या खास क्लबमध्येही एन्ट्री मारली आहे.
पहिल्या पराभवानंतर पाक संघाचे दमदार कमबॅक
झिम्बाब्वे दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघावर डकवर्थ लुईसनुसार ८० धावांनी सामना गमावण्याची वेळ आली होती. दुसऱ्या सामन्यात मात्र पाकिस्तानने दमदार कमबॅक केले. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाला पाकनं ३२.३ षटकात १४५ धावांत आटोपले. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने १८.२ षटकात सामना १० विकेट्स राखून जिंकला. या विजयासह पाक संघाने वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलीये. आयुबच्या शतकी खेळीशिवाय अब्दुल्लाह शफीक याने ४८ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने नाबाद ३२ धावांची खेळी केली.
सैम आयुबच शतक दोन कारणामुळं ठरतं खास
२२ वर्षीय सलामीवीरानं ६२ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११३ धावांची नाबाद खेळी केली. या शतकी खेळीसह त्याने शाहिद आफ्रिदीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. आयुबच्या भात्यातून आलेले पहिले शतक हे एकदम खास आहे. कारण पाकिस्तानकडून संयुक्तरित्या हे तिसरे जलद शतक आहे. फक्त ५३ चेंडूत त्याने शतकाला गवसणी घातली. पाकिस्तानकडून अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. याशिवाय १५० पेक्षा कमी धावांच टार्गेट असताना शतक करणारा तो पहिला क्रिकेटही आहे. या गोष्टीमुळे त्याचे शतक आणखी खास ठरते.
आयुबच्या पुढे फक्त आफ्रिदी
त्याच्याशिवाय या यादीत एकमेव आफ्रिदी आहे. आफ्रिदीनं बांगलादेश विरुद्ध ५३ चेंडूत शतक झळकावले होते. याशिवाय श्रीलंकेविरुद्ध त्याने फक्त ३७ चेंडूत शतकी खेळी साकारली होती. यात आफ्रिदीच्या भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात ४५ चेंडूतील शतकाचाही समावेश आहे.