हरारे: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) मागील आठवड्यात झिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदीची कारवाई केली. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघाला आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. पण, झिम्बाब्वेमधील क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी प्रसंगी मोफतही खेळू, असा निर्धार झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंनी केला आहे.
'आम्ही मोफत खेळण्यास तयार असून आम्ही पात्रता फेरीत खेळण्याचे देखील लक्ष्य ठेवले आहे,' असे झिम्बाब्वे संघातील एका वरिष्ठ खेळाडूने सांगितले. ऑगस्ट महिन्यात महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची, तर ऑक्टोबर महिन्यात पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पात्रता फेरी रंगणार आहे.
सरकारी हस्तक्षेपामुळे आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत झिम्बाब्वे बोर्डाला इशारा देखील देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही सरकारी हस्तक्षेप कमी करण्यात झिम्बाब्वे क्रिकेट अपयशी ठरल्याने अखेर आयसीसीने निलंबनाची कारवाई केली.
झिम्बाब्वेच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांना मागील दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. अलीकडेच झालेल्या नेदरलँड्स व आयर्लंडच्या दौऱ्यांतील सामन्यांचा देखील झिम्बाब्वेच्या खेळाडूंना मानधन मिळाले नाही.