पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान पाक संघानं 315 धावांची आघाडी घेतली आहे. पाकच्या पहिल्या डावातील 191 धावांच्या उत्तरात श्रीलंकेनं पहिल्या डावात 271 धावा केल्या. पण, पाकनं दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 395 धावा करून 315 धावांची आघाडी घेतली. या सामन्यात शान मसूद आणि अबीद अली यांनी शतकी खेळी करून तिसरा दिवस गाजवला. पण, या सामन्यात पाकच्या गोलंदाज शहीन आफ्रिदीनं एका पत्रकारावर वर्णद्वेषी टिप्पणी केली. त्याच्या या वागण्याची तक्रार पत्रकारानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली आहे.
आफ्रिदीनं श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी पाठवून विक्रमाला गवसणी घातली आणि चर्चेचा विषय राहिला. पण, सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यानं पत्रकारावर वर्णद्वेषी टिप्पणी केली. त्यामुळे चुकीच्या कारणामुळे त्याची चर्चा झाली. पत्रकार परिषदेत असघर अली मुबारक या पत्रकारानं त्याला प्रश्न विचारला. त्यावर आफ्रिदी म्हणाला,''जरा तुमच्यावर लाईटीचा फोकस मारा, जेणेकरून तुम्हाला मी पाहू शकतो.'' आफ्रिदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून त्याच्यावर टीकाही होत आहे. या पत्रकारानं याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली आहे आणि आफ्रिदीकडून जाहीर माफीची मागणी केली आहे.
वाह रे पठ्ठ्या; पाकच्या अबीद अलीची तुफान फटकेबाजी; आशियाई फलंदाजांत ठरला 'दादा'!
पाकिस्तानच्या अबीद अलीनं वन डे आणि कसोटी क्रिकेट पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पहिल्या पुरुष क्रिकेटपटूचा मान पटकावताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही शतकी खेळी करताना रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली. त्याचा हा झंझावात 174 धावांवर रोखण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आले, परंतु तोपर्यंत अबीदनं आशियात आतापर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम करून टाकला. त्यानं भारताच्या करूण नायर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावरही 'दादा'गिरी केली.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. कराची येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पाकिस्तानचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळून श्रीलंकेनं 271 धावा केल्या. पण, पाकिस्ताननं दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. शान मसूद आणि अबीद अली यांनी शतकी खेळी केली, परंतु अबीदचे शतक पराक्रमी ठरले. कारकिर्दीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत शतक झळकावणारा तो पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला.
जगात असा विक्रम करणारा तो नववा फलंदाज ठरला. यापूर्वी न्यूझीलंडच्या जिमी निशॅम ( 2014), भारताच्या रोहित शर्मा ( 2013), सौरव गांगुली ( 1996), ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग ब्लेवेट ( 1995), भारताच्या मोहम्मद अझरुद्दीन ( 1984), वेस्ट इंडिज अलव्हीन कालिचरण ( 1972), ऑस्ट्रेलियाच्या डॉज वॉल्टर्स (1965) आणि बिल पोनस्फोर्ड ( 1924) यांनी हा पराक्रम केला आहे. शान मसूद 198 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 135 धावा केल्या.
अबीद आणि शान यांनी पहिल्या विकेटसाठी 278 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी केलेली ही दुसरी सर्वोत्तम बागीदारी ठरली. श्रीलंकेविरुद्धची ही पाकिस्ताच्या फलंदाजांची सर्वोतमत भागीदारी ठरली. पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी कसोटीच्या एकाच डावात शतक झळकावण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1997 मध्ये आमीर सोहैल ( 160 आणि इजाझ अहमद ( 151) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आणि सईद अन्वर ( 101) आणि तौफीक उमर ( 104) यांनी बांगलादेशिवरुद्ध ही कामगिरी केली आहे.
अबीदनं 281 चेंडूंत 21 चौकार व 1 षटकार खेचून 174 धावा करत आणखी एक विक्रम नावावर केला. कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या तीन डावांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अबीदनं नावावर केला. अबीदनं पहिल्या तीन डावांमध्ये 321 धावा केल्या आणि आशियात अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांत त्यानं अव्वल स्थान पटकावले आहे. या विक्रमात टीप फोस्टर ( 355) आणि लॉरेन्स रोवे ( 336) हे आघाडीवर आहेत. अबीदनं भारताच्या करुण नायर ( 320) आणि सौरव गांगुली ( 315) यांचा विक्रम मोडला. पाकिस्तानचे जावेद मियादाँद ( 318) या विक्रमात पाचव्या स्थानावर आहेत.
Web Title: Pakistan pacer Shaheen Afridi accused of making racist remark on journalist in press conference
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.