जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत ट्वेंटी-२० लीग म्हणून आयपीएलकडं पाहिलं जातं. जगभरातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी होत असतात. आयपीएलची एवढी क्रेझ आहे की, अनेकदा यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देखील फटका बसतो.
२२ मार्चपासून आयपीएलचा सतरावा हंगाम खेळवला जात आहे. आगामी हंगामासाठी परदेशी खेळाडू आपापल्या संघासोबत जोडले जात आहेत. नुकतीच शेजारील देशात पाकिस्तान सुपर लीग खेळवली गेली.
सोमवारी पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना खेळवला गेला. मुल्तान सुल्तान आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात झालेल्या लढतीत शादाब खानच्या नेतृत्वातील इस्लामाबादच्या संघानं बाजी मारली.
मोहम्मद रिझवानच्या मुल्तान सुल्तान संघाला पुन्हा एकदा उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं. दिवसेंदिवस जगभरात लीग क्रिकेटचं प्रमाण वाढत चाललं आहे.
पाकिस्तानात आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाते, तर बांगलादेश प्रीमिअर लीगही आशियाई देशातील लोकप्रिय लीग होत चालली आहे. महिला क्रिकेटला प्राधान्य मिळावं यासाठी मागील वर्षापासून भारतात महिला प्रीमिअर लीग खेळवली जाते.
यंदा महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम पार पडला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं विजय मिळवून आरसीबीच्या फ्रँचायझीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. पदार्पणाच्या हंगामात मुंबई इंडियन्सनं किताब जिंकला होता.
महिला प्रीमिअर लीग लोकप्रियता, पैसा, प्रसिद्धी आणि ग्लॅमरसच्या बाबतीत पाकिस्तान सुपर लीगपेक्षा खूप पुढे असल्याचे दिसते. स्पर्धेच्या दुसऱ्याच हंगामात स्टार खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करून या स्पर्धेला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं.
रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यात किताबासाठी लढत झाली. आरसीबीच्या रिचा घोषनं विजयी चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, आयपीएलमधील विजेत्या संघाला २० कोटी तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रूपयांचं बक्षीस दिलं जातं. तर महिला प्रीमिअर लीगमधील विजेत्या संघावर ६ कोटी रूपयांचा वर्षाव होता. तर अंतिम फेरीतील पराभूत संघाला ३ कोटी रूपये दिले जातात.
बक्षिसांच्या रकमेच्या बाबतीत महिला प्रीमिअर लीग पाकिस्तान सुपर लीगपेक्षा पुढे आहे. PSL मधील विजेत्या संघाला ४.१५ कोटी रूपये दिले जातात. तर उपविजेता संघ १.६ कोटी रूपयांचा मानकरी ठरतो.