४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई

Tejashwi Yadav IPL Income : ३४ वर्षीय तेजस्वी यादव यांचे क्रिकेटशी घट्ट नाते आहे.

बिहारच्या राजकारणातील एक मोठा चेहरा म्हणजे तेजस्वी यादव. ३४ वर्षीय तेजस्वी यादव यांचे क्रिकेटशी घट्ट नाते आहे. राजकारणात येण्यापूर्वी तेजस्वी एक व्यावसायिक क्रिकेटर होते हे फार कमी लोकांना माहिती असून, आता खुद्द त्यांनीच विरोधकांना याची आठवण करुन दिली.

दिग्गज नेते लालू यादव यांचे चिरंजीव असलेल्या तेजस्वी यांच्यावर अनेकदा घराणेशाहीचा आरोप झाला. नववी नापास म्हणून विरोधकांनी त्यांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही.

तेजस्वी यांनी केवळ देशांतर्गत क्रिकेट खेळले नाही तर जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या ट्वेंटी-२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये देखील प्रतिनिधित्व केले.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आयपीएल २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने खरेदी केले होते. झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तेजस्वी यांना पहिल्या हंगामाच्या लिलावात दिल्लीने ८ लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. तेजस्वी यादव यांच्यात गोलंदाजी करण्याचीही क्षमता होती.

तेजस्वी यांच्यावर दिल्लीच्या फ्रँचायझीने चार वर्षे बोली लावली. २००८ ते २०१२ दरम्यान २०१० हे असे एक वर्ष होते जेव्हा तेजस्वी या आयपीएलमधून बाहेर होते. खरे तर दुखापतीमुळे तेजस्वी यांना क्रिकेट सोडावे लागले आणि त्यानंतर ते राजकारणात आले.

आयपीएल २००८ साठी तेजस्वी यांना ८ लाख रुपये मिळाले होते. मग पुढच्या हंगामासाठी देखील त्यांना तितकीच रक्कम मिळाली. आयपीएल २०१० मध्ये ते स्पर्धेचा भाग नव्हते.

२०११ मध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावर बोली लागली आणि १० लाख रुपयांत खरेदी झाली. याशिवाय २०१२ मध्येही दिल्लीच्या फ्रँचायझीने तेजस्वी यांना आपल्या ताफ्यात घेतले.

विशेष बाब म्हणजे चार वर्ष दिल्लीच्या संघाचा भाग असणाऱ्या तेजस्वी यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

त्यावेळी दिल्लीच्या संघात बड्या नावांचा समावेश होता. त्यामुळे नवख्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असे.

आयपीएलचा एकही सामना खेळला नसला तरी तेजस्वी यादव यांनी आयपीएमधून एकूण ३६ लाख रुपयांची कमाई केली.