न खेळताही ७ खेळाडू बनले करोडपती! १२५ कोटीतून ४२ जणांना मिळणार वाटा

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा देशातील विविध भागांत अजूनही साजरा होतो आहे. चाहत्यांच्या उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या चॅम्पियन संघाला १२५ कोटी रुपयांची पुरस्कार राशी दिली.

पण, पुरस्काराची ही रक्कम खेळाडूंना कशी वाटली जाईल? सर्व खेळाडूंना समसमान रक्कम मिळेल का? प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही चॅम्पियन खेळाडूंइतकेच पैसे मिळतील का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

७ खेळाडू खेळलेच नाही भारताच्या १५ सदस्यीय संघातील युझवेंद्र चहल, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांना टी-२० विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या तिघांना न खेळताच ५ कोटी रुपये मिळणार आहेत.

या तिघांनाच संघात स्थान मिळू शकले नाही तर राखीव खेळाडूंसाठी टी-२० विश्वचषकात खेळणे अजून दूरचे होते. त्यामुळे एकूण सात खेळाडू न खेळताच मालामाल झाले.

राखीव खेळाडूंना १ कोटी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या गेल्या टी-२० विश्वचषकात भारत ४२ सदस्यांसह दाखल झाला होता. यात १५ प्रमुख खेळाडूंसह ४ राखीव खेळाडूंचासुद्धा समावेश होता.

युझवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल,संजू सॅमसन यांना ५-५ कोटी तर शुभमन गिल,रिंकू सिंग,खलील अहमद, आवेश खान यांना १-१ कोटी मिळणार आहेत.

...असे होणार वाटप माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, संघात असलेल्या सर्व १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आले. याव्यतिरिक्त संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनासुद्धा ५ कोटींची धनराशी दिली गेली.

निवड समिती सदस्यांचीही चांदी द्रविड यांच्याव्यतिरिक्त इतर कोचिंग स्टाफला प्रत्येकी २.५ कोटी रुपये दिले जातील, सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला २ कोटी, तर अजित आगरकर आणि निवड समिती सदस्यांना प्रत्येकी १ कोटी मिळाले आहेत.