AB De Villiers Birthday: सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा, तरी एका घटनेनं धायमोकलून रडला होता डी'व्हिलियर्स!

AB De Villiers Birthday: एबी डिव्हिलियर्सचं नाव जगातील सर्वोत्तम फलंदाजंमध्ये घेतलं जातं. त्यानं मॉर्डन-डे क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलं. पण एक स्वप्नं तुटल्यानं डिव्हिलियर्स धायमोकलून रडला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक, शतक आणि १५० धावांची खेळी साकारणारा तसंच सर्वात जलद गतीनं ९ हजार धावा पूर्ण करणारा दूसरा खेळाडू तर सलग १२ कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणाऱ्या एबी डिव्हिलियर्सचा आज वाढदिवस आहे.

एबी डीव्हिलियर्सची किर्ती खरंतर त्याच्या करिअरच्या आकडेवारीपेक्षाही खूप मोठी आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलवण्याची ताकद आणि कला डीव्हिलियर्सच्या फलंदाजी आहे. यामुळेच डीव्हिलियर्सला मिस्टर-३६० डीग्री क्रिकेटर म्हटलं जाऊ लागलं.

डीव्हिलियर्सनं आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत द.आफ्रिका संघासाठी अनेक मॅच विनिंग खेळी साकारल्या. २०१५ साली तर डीव्हिलियर्सनं इतिहास रचला होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात डीव्हिलियर्स अवघ्या ३१ चेंडूत शतक ठोकलं होतं. ४४ चेंडूत १४९ धावा करुन तो बाद झाला होता. यात १६ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता.

याच सामन्यात त्यानं अवघ्या १६ चेंडूत ५० धावा केल्या होत्या आणि सर्वात जलदगतीनं अर्धशतक करण्याचा विक्रम नावावर केला होता.

सर्वात वेगवान अर्धशतक आणि शतक ठोकल्यानंतर लगेच दोन महिन्यांनी डी'व्हिलियर्सनं ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जलद १५० धावा करण्याचा विक्रम केला होता.

डीव्हिलयर्सनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात ६४ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या होत्या. जेसन होल्डरच्या अखेरच्या षटकात पाच चेंडूंवर ४ षटकार आणि एक चौकार ठोकला होता. एकाच षटकात त्यानं ३० धावा वसुल केल्या होत्या. डीव्हिलियर्सनं ६६ चेंडूत नाबाद १६२ धावांची तुफान खेळी साकारली होती.

डीव्हिलियर्सनं शतक अवघ्या ५२ चेंडूत आणि पुढील ५० धावा तर फक्त १२ चेंडूत केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशापद्धतीनं सर्वात जलद अधर्शतक, शतक आणि दिडशतक ठोकण्याचा पराक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर नोंदवला गेला.

डीव्हिलयर्स वन मॅन आर्मीसारखा आपल्या संघाचं वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधीत्व करत होता. पण द.आफ्रिकेचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न अधुरचं राहिलं. द.आफ्रिकेचा सेमीफायनलमघ्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाला होता. डकवर्थ लुईस नियमानुसार द.आफ्रिकेचा संघ ४ विकेट्सनं पराभूत झाला होता.

डीव्हिलियर्स याच पराभवानंतर भर मैदानात धायमोकलून रडला होता. देशासाठी वर्ल्डक जिंकण्याचं स्वप्नं अधुरं राहिलं आणि याची सल आजही डीव्हिलियर्सच्या मनात आहे.