Join us  

एक कर्णधार असाही...BCCI ने पराभवानंतर केली गच्छंती; भारतात परतताच घेतली निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 6:34 PM

Open in App
1 / 8

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघात प्रचंड गोंधळ सुरू आहे. विराट कोहलीने कामाच्या ओझ्यामुळे T-20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बीसीसीआयने कारवाई करत त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवले. कोहलीला 48 तासांचा अवधी देण्यात आल्याचे बोर्डाने म्हटले आहे, तर विराटने त्यास नकार दिला. या सगळ्यांतील गोंधळामुळे कोहली आणि बीसीसीआयमधील तणाव खूपच वाढला आहे.

2 / 8

यामुळे आता भारतीय क्रिकेट किंवा कोहलीच्या कारकिर्दीला चांगलाच फटका बसू शकतो, अशी भीती आता क्रिकेट चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. पण, भारतीय क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडत नाहीये. याआधीही कर्णधारपदावरून खेळाडूंमध्ये अनेकदा वाद झाले आहेत. अजित वाडेकरांसारख्या दिग्गजाची क्रिकेट कारकीर्द कर्णधारपदाच्या वादात एका झटक्यात संपुष्टात आली.

3 / 8

ही गोष्ट 1974 ची आहे, जेव्हा टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार होती. त्यावेळेस भारतीय संघाचे नेतृत्व अजित वाडेकर यांच्या हातात होते. अजित वाडेकर यांनी त्यापूर्वी सलग तीन मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार होण्याचा पराक्रम केला होता. वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली, परंतु 1974 चा इंग्लंड दौरा वाडेकरांसाठी वाईट ठरला.

4 / 8

इंग्लंडने भारतीय संघाचा त्यांच्याच घरात 3-0 ने पराभव केला होता. तेव्हा टीम इंडियामध्ये कर्णधार वाडेकर, सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, भागवत चंद्रशेखर, एस. व्यंकटरघवन आदी दिग्गज खेळाडू उपस्थित होते. या मालिकेपूर्वी टीम इंडियाने 1970-71 मध्ये वेस्ट इंडिजचा 1-0त्यांच्या भूमीवर, 1971 मध्ये इंग्लंडचा1-0 त्यांच्या भूमीवर आणि 1972-73 मध्ये इंग्लंडचा भारत दौऱ्यावर 2-2 असा पराभव केला होता.

5 / 8

पण, इंग्लंड दौऱ्यावरील एका सामन्यात भारतीय संघाने लाजिरवाणी कामगिरी केली होती. टीम इंडिया एका डावात अवघ्या 42 धावांवर ऑल आउट झाली होती. ही धावसंख्या कसोटीतील एका डावातील त्यांची सर्वात कमी धावसंख्या होती. हा विक्रम पुढ 46 वर्षे कायम राहिला. आता भारतीय संघाने 36 धावांच्या सर्वात कमी धावसंख्येचा स्वतःचा नकोसा विक्रम नोंदवला आहे. डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात संघाने ही धावसंख्या केली होती.

6 / 8

त्या दौऱ्यानंतर अजित वाडेकरांवर भारतात जोरदार टीका होऊ लागली. त्यांच्यावर चाहते संतापले आणि त्यांच्या घरावर दगडफेकही केली. संघातही वरिष्ठ खेळाडू आणि कर्णधार यांच्यातील तणाव खूपच वाढला होता. त्यानंतर वाडेकर यांची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना कर्णधारपदावरुन हटवल्याची माहिती मिळताच वाडेकर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

7 / 8

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाने आपल्या कसोटी इतिहासात एका डावात सर्वात कमी 36 धावा केल्या. या कसोटीत कोहली कर्णधार होता. या कामगिरीनंतर कोहलीच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या कामगिरीवरही जोरदार टीका झाली. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाले, त्या सामन्यात कोहलीच्या कर्णधारपदावर त्याने योग्य प्लेइंग-11 मैदानात उतरवले नाही, अशी टीका झाली होती.

8 / 8

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला, यावेळीही कर्णधार कोहली होता. भारतीय संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. खुद्द कोहलीची कामगिरीही गेल्या 2 वर्षांपासून चांगली नव्हती. नोव्हेंबर 2019 पासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, T20) शतक करता आले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही.

टॅग्स :विराट कोहलीअजित वाडेकरबीसीसीआय
Open in App