"पॉली, तुझ्यापेक्षा चांगला मित्र मिळणार नाही", हार्दिक पांड्याची पोलार्डसाठी भावनिक पोस्ट

कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिक पांड्याने एक भावनिक पोस्ट केली आहे.

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड सध्या चर्चेत आहे. पोलार्डने मंगळवारी मोठा निर्णय घेत आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कायरन पोलार्डने आयपीएलचा निरोप घेतला.

कायरन पोलार्डने मंगळवारी आयपीएलमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मुंबई इंडियन्सच्या संघाचा प्रमुख हिस्सा राहिलेल्या पोलार्डने एक भावनिक पोस्ट करून चाहत्यांना संदेश दिला. "मला आणखी काही वर्षे खेळायचे असल्याने हा निर्णय सोपा नव्हता, पण मुंबई इंडियन्सशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या आयपीएल कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मला माहिती आहे की या अविश्वसनीय फ्रँचायझीने मला खूप मिळवून दिले आहे." पोलार्डने भावनिक पोस्ट करून आपल्या निवृत्तीवर स्पष्टीकरण दिले.

कायरन पोलार्ड आणि भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जुने मित्र आहेत. हे दोघेही मुंबई इंडियन्सच्या संघात एकत्र खेळायचे. आता आपल्या सहकाऱ्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर हार्दिकने देखील त्याच्यासाठी खास ओळी लिहल्या आहेत. खरं तर हार्दिक पांड्या सध्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर असून तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

आयपीएलचा निरोप घेताना पोलार्डने सर्वांचे आभार मानले. "मला मुंबईच्या फ्रँचायझीने खूप काही दिले आहे, त्यामुळे मी यापुढे मुंबईसाठी खेळलो नाहीतर मी स्वतःला MI विरुद्ध खेळताना पाहू शकत नाही. हा MI ला भावनिक निरोप नाही. कारण मी आयपीएलमध्ये फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यासह एमआय एमिरेट्ससोबत खेळण्यास सहमती दर्शवली आहे. माझ्या कारकिर्दीतील हा पुढचा अध्याय खरोखरच रोमांचक आहे आणि मला स्वतःला खेळण्यापासून कोचिंगमध्ये बदलण्याची परवानगी देत आहे."

खरं तर मी मुंबई इंडियन्सच्या विरोधात खेळू शकत नाही असे कायरन पोलार्डने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची तारीख होती. मात्र कायरन पोलार्डने ही यादी जाहीर होण्याच्या आधीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

भारतीय संघाच्या टी-२० संघाचा विद्यमान कर्णधार हार्दिक पांड्याने एक भावनिक पोस्ट करून आपल्या सहकाऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. "माझ्या पॉली, मला तुझ्यापेक्षा चांगला सल्लागार आणि मित्र मिळू शकत नाही. तुझ्यासोबत मैदानावर खेळणे हा माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव आहे."

पोलार्डचे आभार मानताना हार्दिकने म्हटले, "तुझ्यासोबत घालवलेला एकही क्षण दुःखाचा नव्हता. तुझ्या नवीन भूमिकेसाठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. मी तुला ज्या प्रकारे ओळखतो, त्यामुळे नक्कीच तू तुझ्या नवीन भूमिकेत यशस्वी होशील. तसेच निडर क्रिकेटर्सच्या आणखी एका पिढीला प्रेरणा देत राहशील. माझ्या भावा सर्व गोष्टींसाठी धन्यवाद, शुभेच्छा आणि लवकरच भेटू."

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघासोबत १३ वर्ष खेळायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो. पण आता एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करणार आहे. स्टेडियममधील तो आवाज, जयघोषाचा तो नारा, सर्व काही. आम्ही एकत्र मिळून २०११ व २०१३ ची चॅमियन्स ट्रॉफी जिंकली आणि २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये आयपीएल जेतेपद जिंकले. असे म्हणत कायरन पोलार्डने मुंबईच्या संघातून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली.

हार्दिकच्या या पोस्टवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. चाहते कमेंटच्या माध्यमातून म्हणतायत की, पोलार्डला आयपीएलमध्ये खेळताना पाहणे त्यांच्यासाठी खूप आनंददायक होते. मात्र आता त्याला खेळताना न पाहणे खूप कठीण असणार आहे.

कायरन पोलार्ड आता मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली तेव्हा त्यात कायरन पोलार्डचेही नाव होते. मात्र पोलार्डने आधीच निवृत्ती जाहीर केली होती आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध कोणत्याही संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तब्बल १३ वर्षे मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळल्यानंतर तो आता त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून जोडला जाणार आहे.