मुरली विजय मागील मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर आहे. एकेकाळी त्याला भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज मानले जायचे. त्याने 61 कसोटी सामन्यांमधील 57 डावांमध्ये भारतासाठी सलामी देताना 40 च्या सरासरीने 3880 धावा केल्या आहेत.
खरं तर मुरली विजयने त्याची कसोटीमधील सर्व 12 शतके सलामीवीर म्हणून खेळताना केली आहेत. पण 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याला टीम इंडियातून बाहेर काढण्यात आले होते. 5 वर्षानंतरही तो संघात पुनरागमन करू शकला नाही. यावरूनच आता मुरलीने बीसीसीआयवर आपला संताप व्यक्त केला आहे.
मुरली विजय म्हणाला की, भारतीय क्रिकेटमध्ये संधी मिळण्यात त्याचे वय अडथळा ठरत आहे. मुरली आता 38 वर्षांचा आहे. तो नुकताच तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता. पण, दोन वर्षांपासून त्याला आयपीएलमध्येही संधी मिळालेली नाही. म्हणून त्याने आता विदेशात आपले नशीब आजमवणार असल्याचे म्हटले आहे.
स्पोर्ट्स स्टारवरील एका कार्यक्रमात बोलताना मुरलीने सांगितले की, 'बीसीसीआयसोबतचा माझा संबंध आता जवळपास संपला आहे आणि मी आता विदेशात संधी शोधत आहे. मला अजूनही स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आहे.'
'आपण 30 वर्षांचे झाल्यावर अस्पृश्य बनतो. मला वाटते की यानंतर सर्वजण 80 वर्षाचे म्हणून पाहू लागतात. प्रसारमाध्यमेही आपल्याला असेच दाखवतात. मला वाटते की मी अजूनही माझे सर्वोत्तम देऊ शकतो. पण दुर्दैवाने खूप कमी संधी आहेत आणि आता मला देशाबाहेर संधी शोधाव्या लागत आहेत.'
या मुद्द्यावर तो पुढे म्हणाला की, जर मला वीरेंद्र सेहवागसारखा पाठिंबा मिळाला असता तर कदाचित माझ्यासाठी परिस्थिती वेगळी असती. पण आता विचार करण्यात अर्थ नाही. मी आता विदेशात क्रिकेट खेळण्याचा विचार करत आहे.
लक्षणीय बाब म्हणजे 2020 मध्ये मुरली विजयला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी तामिळनाडू संघातून वगळण्यात आले होते.
मुरली विजय त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही वादात सापडला आहे. त्याने त्याचा मित्र आणि सहकारी क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या पत्नीशी लग्न केले. खरं तर दिनेश आणि मुरली चांगले मित्र होते. याच कारणावरून दिनेशची पहिली पत्नी निकिता आणि मुरली यांची भेट व्हायची. हळूहळू या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि नंतर नात्याचे रुपांतर प्रेमात झाले.
मुरली विजय आणि आपल्या पत्नीची मैत्री दिनेश कार्तिकला कळताच त्याने निकिताला घटस्फोट दिला. यानंतर मुरलीने निकितासोबत लग्न केले. तर दिनेशने स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलला आपली जोडीदार बनवली.
मुरली विजयने भारतासाठी 61 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3982 धावा केल्या. तसेच त्याने कसोटीत 12 शतके आणि 15 अर्धशतके ठोकली आहेत. त्याचबरोबर 17 वन डे सामन्यांमध्ये मुरलीच्या नावावर 339 धावांची नोंद आहे. तर 9 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये त्याने 169 धावा केल्या आहेत.
एकेकाळी मुरली विजय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीची धुरा सांभाळायचा. आयपीएल 2010 मध्ये त्याने 15 सामन्यांमध्ये 156 च्या स्ट्राईक रेटने 458 धावा केल्या. तो शेवटचा 2020 मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, ईशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.