IND vs ENG 2nd Test: "मी शतक झळकावलं पण...", शुबमन गिलला का सतावतेय वडिलांची भीती?

शुबमन गिलने दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात शतकी खेळी केली.

सध्या भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या शुबमन गिलने दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. याआधी त्याला शेवटच्या १३ डावात एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गिलने १४७ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह शतक झळकावून पुढील काही कसोटी सामन्यांमधील आपले स्थान निश्चित केल्याचे दिसते. गिलच्या खेळीमुळे भारताला दुसऱ्या डावात २५५ धावा करून ३९८ धावांची मजबूत आघाडी घेता आली.

दिवसाचा खेळ संपल्यानंतर गिलने आपल्या खेळीबद्दल भाष्य केले आहे. गिल म्हणाला की, या शतकानंतर नक्कीच खूप आनंदी आहे, पण खरं सांगायचे तर मला बाद होण्याबाबत थोडी शंका होती. चहाच्या वेळेपर्यंत मी आणखी ५-६ षटके खेळायला हवी होती.

खेळपट्टीबाबतच्या प्रश्नावर गिल म्हणाला की, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. मात्र, ऑन द राइज शॉट्स खेळणे इथे सोपे नाही. फलंदाजांना डोक्याचा चांगला वापर करावा लागत आहे, कारण काही चेंडू अचानक वळत आहेत आणि काही खूप खाली राहिले आहेत.

तसेच मी आज जे फटके खेळले त्यावरून माझे वडील मला सुनावतील यात शंका नाही. मला वाटते की, हॉटेलमध्ये गेल्यावर मला याबाबत कळेल. कारण तिथे माझे वडील मला खेळीबद्दल नक्कीच सांगतील. या आधी देखील मला त्यांनी माझ्या खेळीवरून खडेबोल सुनावले आहे, असेही गिलने सांगितले.

दुसऱ्या सामन्याच्या संभाव्य निकालाबाबत गिलने सांगितले की, तिसऱ्या दिवसानंतर ७०-३० अशी स्थिती आहे. म्हणजेच भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे.

चौथ्या दिवशी सकाळचे सत्र अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. सकाळच्या वेळी खेळपट्टीत ओलावा असतो आणि त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना मदत होते हे सर्वांनी पाहिले आहे.

पहिल्या सामन्यात विजय मिळवून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे.