धर्मशाला कसोटी R Ashwin साठी ऐतिहासिक ठरणार! ८ अचंबित विक्रम नोंदवणारा वयस्कर भारतीय

भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) गुरुवारी धर्मशाला येथे खेळवण्यात येणाऱ्या India vs England 5th Test कसोटीत इतिहास रचणार आहे. आयसीसी कसोटी गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनची ही १०० वी कसोटी आहे.

१०० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरणार आहे. अश्विनपूर्वी ही कामगिरी करणाऱ्या १३ भारतीय खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर ( १२५ ), दिलीप वेंगसरकर ( ११६ ), कपिल देव ( १३१ ), सचिन तेंडुलकर ( २०० ), अनिल कुंबळे ( १३२ ), राहुल द्रविड ( १६४ ), सौरव गांगुली ( ११३ ), व्हीव्हीएस लक्ष्मण ( १३४ ), हरभजन सिंग ( १०३ ), वीरेंद्र सेहवाग ( १०४ ), इशांत शर्मा ( १०५ ), विराट कोहली ( ११३ ) आणि चेतेश्वर पुजारा ( १०३) यांचा समावेश आहे.

केवळ ऑस्ट्रेलिया ( १५ ) आणि इंग्लंड ( १६) यांच्याकडे १०० कसोटी कॅप्स असलेले जास्त खेळाडू आहेत. जॉनी बेअरस्टो इंग्लंडसाठी धर्मशाला येथे १०० वी कसोटी खेळणारा १७ वा खेळाडू बनणार आहे.

३७ वर्ष व १७२ दिवसांचा अश्विन हा १०० वी कसोटी खेळणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू असेल. जेफ्री बॉयकॉट ( ४० वर्ष व २५४ दिवस), क्लाइव्ह लॉईड ( ३९ वर्ष व २४१ दिवस ), ग्रॅहम गूच ( ३९ वर्ष व १९० दिवस ), गॉर्डन ग्रीनिज ( ३८ वर्ष व ३४६ दिवस ) आणि युनिस खान ( ३७ वर्ष व २०८ दिवस ) यांच्यानंतर अश्विन हा सहाव्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.

सौरव गांगुली ( ३५ वर्ष व १७१ दिवस ), सुनील गावस्कर ( ३५ वर्ष व ९९ दिवस ), अनिल कुंबळे ( ३५ वर्ष व ६२ दिवस ) आणि चेतेश्वर पुजारा ( ३५ वर्ष व २३ दिवस ) यांनी ३५ वर्षांचे झाल्यानंतर १०० व्या कसोटीत प्रवेश केला होता.

आर अश्विन हा कॅलेंडर वर्षात ( ७२ विकेट्स, २०१६ ) सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. कपिल देव ( ७५ विकेट्स, १९८३ व ७४ विकेट्स, १९७९) आणि अनिल कुंबळे ( ७४ विकेट्स, २००४) हे या विक्रमात आघाडीवर आहेत.

आर अश्विनच्या कसोटी पदार्पणानंतर कॅलेंडर वर्षात एकाही गोलंदाजाला कसोटीत ७० हून अधिक विकेट घेता आलेल्या नाहीत. २००८ मध्ये डेल स्टेनने ७४ विकेट्स घेतल्या होत्या. २०१८ मध्ये अश्विनने डावात ८ वेळा पाच विकेट्स व सामन्यात ३ वेळा १० विकेट्स घेतल्या होत्या आणि भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

सात खेळाडूंनी एका कॅलेंडर वर्षात ५००धावा आणि ५० विकेट्स अशी दुहेरी कामगिरी केली आहे, त्यात अश्विनचा समावेश आहे. त्याने २०१६ मध्ये ४३.७१ च्या सरासरीने ६१२ धावा केल्या होत्या आणि ७२ विकेट्स मिळवल्या होत्या. आजपर्यंत अशी कामगिरी केलेल्या सहा अन्य खेळाडूंमध्ये इयान बॉथम ( १९७८ न १९८१ ), कपिल देव ( १९७९ व १९८३ ), शॉन पोलॉक ( १९९८ व २००१ ), अँड्र्यू फ्लिंटॉफ ( २००५), डॅनियल व्हिटोरी ( २००८ ) आणि मिचेल जॉन्सन ( २००९ ) यांचा समावेश आहे.

९९ कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स असणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन ( ५८४) नंतर दुसऱ्या क्रमांकावर अश्विनचा ( ५०७) क्रमांक येतो. सचिन तेंडुलकर ( ७२) व विराट कोहली ( ५९) यांच्यानंतर भारतासाठी सर्वाधिक कसोटी जिंकण्याचा पराक्रम अश्विनच्या ( ५८ ) नावावर आहे.