मुंबईचा 'दिग्गज'! देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी; रहाणेची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेने चमकदार कामगिरी केली.

मागील काही कालावधीपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असलेला मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे.

पण, आता तो टीम इंडियात पुनरागमन करणार का? अजिंक्य रहाणे पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार का? याची सर्वत्र चर्चा आहे. रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून नेहमीच प्रभावी कामगिरी केली. त्याने देवधर ट्रॉफी (२०१८), दुलीप ट्रॉफी (२०२२-२३) आणि रणजी करंडक स्पर्धेत (२०२४) रहाणेने आपल्या नेतृत्व कौशल्याने संघाला विजय मिळवून दिला.

अलीकडेच त्याने काउंटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. अजिंक्य रहाणेच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे ४० वे शतक ठरले. इराणी चषकात मुंबईने शेष भारत संघाचा पराभव करत इराणी चषक जिंकला.

अजिंक्य रहाणेने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अजिंक्य रहाणे लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

याआधी अजिंक्य रहाणे जुलै २०२३ मध्ये भारताकडून शेवटची कसोटी खेळला होता. तेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. रहाणेने ३६ चेंडूत ८ धावा केल्या होत्या. त्यानंतर अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.

मात्र, काउंटी क्रिकेट आणि इराणी चषकातील चमकदार कामगिरीनंतर पुनरागमनाची आशा आहे. आगामी काळात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. आता न्यूझीलंड मालिकेत अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का हे पाहण्याजोगे असेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेचे पुनरागमन होऊ शकते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी १६ ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेनंतर भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून खेळवली जाईल.